नवी दिल्ली : Marathi Sahitya Sammelan |पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.२१) दिल्लीमध्ये ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तारा भवाळकर यांच्यामध्ये होते. यावरून मिश्किल टिपण्णी करत फडणवीस म्हणाले की अजूनही ताराबाईंच्या भाषणात रहावे, असेच आपल्या सर्वांना वाटते. मात्र ज्यांनी आत्ताच उत्तम भाषण केले त्या तारा भवाळकर आणि ज्यांचे भाषण तुम्ही ऐकण्यास उत्सुक आहात, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये मी बोलणं म्हणजे चांगल्या सुरात अ-सुराचे काम करण्याचे भाग्य लाभल्यासारखे आहे, यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
फडणवीस म्हणाले की, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिले संमेलन आहे. कदाचित साहित्य संमेलन अभिजात भाषेची वाट बघत असेल. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यात आज्ञावली मराठी भाषेत पहिल्यांदा तयार केली. त्यामुळे राज्य सरकारसाठी ती प्रेरणादायी गोष्ट आहे. जिथे संमलेन होत आहे त्या तालकटोरा स्टेडियमवर मराठ्यांनी छावणी लावली होती आणि दिल्ली जिंकली होती. आता पुन्हा विचारांनी दिल्ली जिंकू, असेही फडणवीस म्हणाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की जो आपल्या मातृभाषेवर प्रेम करतो त्याला माया, प्रेम आणि वात्सल्य समजते. आपल्या भाषेवर प्रेम करतो तो कोणाचा द्वेष करू शकत नाही. मराठी अतिशय समृद्ध भाषा आहे. मराठी माणसाच्या ठाई ठाई संस्कृती वसली आहे. येणाऱ्या काळात आणखी संमेलने भव्य करू, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी साहित्य संमेलनाच्या मंचावर दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री फडणवीस, स्वागताध्यक्ष शरद पवार आणि संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर मंचावर येत होत्या. तारा भवाळकर मंचावर येत असताना पायरी चढताना त्यांना काहीशी अडचण होऊ लागली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तारा भवाळकर यांचा हात हातात घेत त्यांना मंचावर आणले. देवेंद्र फडणवीस यांची ही कृती सभागृहात लक्षवेधी राहिली. मंचावर आल्यानंतर दोघांनी एकमेकांना नमस्कारही केला.