Noida girl apology file photo
राष्ट्रीय

Noida girl apology: पंतप्रधान मोदींविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नोएडातील मुलीचा व्हिडीओ व्हायरल

जंतर-मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपशब्द वापरल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या नोएडातील रुचिका सिंह हिने हात जोडून देशाची माफी मागितली आहे.

मोहन कारंडे

Noida girl apology PM Modi abuse controversy

नवी दिल्ली : जंतर-मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपशब्द वापरल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या नोएडातील रुचिका सिंह हिने हात जोडून देशाची माफी मागितली आहे. दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर तिने सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसिद्ध करत आपण केवळ १५ वर्षांची असून आंदोलनातील इतरांच्या प्रभावाखाली हे वक्तव्य केल्याचा दावा केला आहे.

व्हिडीओमध्ये रुचिका सिंह म्हणाली की, "मी माझ्या मैत्रिणीसोबत कनॉट प्लेसला गेले होते. तिथे आंदोलन सुरू होते आणि अनेक गट उपस्थित होते. काहीजण पंतप्रधानांविरोधात अत्यंत अश्लील भाषा वापरत होते. त्यांनी मलाही काहीतरी बोलण्यास सांगितले. त्यांच्या प्रभावाखाली येऊन मीही अनेक चुकीच्या गोष्टी बोलले. मी फक्त १५ वर्षांची आहे."

तिने पुढे सांगितले की, "मी जे बोलले ते अक्षम्य आहे. मी अतिशय अश्लील शब्दांचा वापर केला. मात्र, ही माझी पहिली आणि शेवटची चूक आहे. भविष्यात मी अशी चूक पुन्हा करणार नाही. तो व्हिडीओ मी स्वतः पोस्ट केलेला नाही. मी संपूर्ण देशाची माफी मागते. कृपया मला माफ करा."

पोलिसांना मिळालेल्या माहितीमध्ये विसंगती

मात्र, रुचिकाचा अल्पवयीन असल्याचा दावा पोलिसांकडून समोर आलेल्या माहितीसोबत जुळत नसल्याचे सांगितले जात आहे. एक्सप्रेसवे पोलीस ठाण्याचे एसएचओ अमित खरे यांनी यापूर्वी सांगितले होते की, रुचिका कुटुंबासह फरीदाबाद येथे राहते. तसेच जानेवारी महिन्यात तिने नोएडातील सेक्टर १५० येथील लोटस झिंग सोसायटीमध्ये फ्लॅट खरेदी केला आहे. या सोसायटीतील सुरक्षा रक्षक मेहताब सिंह यांनीही रुचिका अनेक वर्षांपासून आईसोबत येथे राहत असल्याचे आणि जंतर-मंतर प्रकरणानंतर ती अचानक बेपत्ता झाल्याचे सांगितले.

झिरो एफआयआर दिल्ली पोलिसांकडे वर्ग

गाझियाबादमधील वकील स्मृती सिंह यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेला झिरो एफआयआर भारतीय न्याय संहिता कलम ३५२ (जाणीवपूर्वक अपमान करून शांततेचा भंग घडविण्याचा प्रयत्न), कलम ३५३(१) (सार्वजनिक उपद्रव) आणि कलम ३५६(१) (मानहानी) अंतर्गत नोंदविण्यात आला आहे. कथित घटना दिल्लीत घडल्यामुळे हा गुन्हा पुढील तपासासाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडे वर्ग करण्यात आला आहे.

याशिवाय, आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर प्रसारित झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी स्वतंत्र एफआयआरही दाखल केला असून संबंधित व्हिडिओ हटविण्यासाठी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नोटीस बजावण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींचीही प्रतिक्रिया

या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिक्रिया दिली. इंस्टाग्रामवरील एका व्हिडीओमध्ये त्यांनी स्वतःविरुद्ध आणि त्यांच्या आईविरोधात वापरण्यात आलेली भाषा ही "सांस्कृतिक धक्का" असल्याचे म्हटले. त्यांनी संबंधित तरुणांवर कठोर कारवाई करण्याऐवजी संयम बाळगण्याचे आवाहन केले. "या तरुणांना शिक्षा देण्याऐवजी त्यांना समजून घेण्याची गरज आहे. केवळ गुन्हे दाखल करून किंवा न्यायालयीन प्रक्रिया राबवून अशा सामाजिक समस्यांचे निराकरण होणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT