अनिल साक्षी
द्रास : भारत आणि पाकिस्तानमधील भविष्यातील कोणतीही चर्चा केवळ पाकिस्तानच्या बेकायदा ताब्यात असलेल्या काश्मीरच्या (पाकव्याप्त काश्मीर - पीओके) मुद्द्यावरच होईल, असा स्पष्ट आणि कडक इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी पाकिस्तानला दिला.
कारगिल युद्ध स्मारकावर आयोजित कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भारताचे सार्वभौमत्व आणि सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाला भारतीय सशस्त्र दल निर्णायक उत्तर देण्यास सक्षम असल्याचेही ते म्हणाले. ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत ते म्हणाले, भारताने दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना योग्य संदेश दिला. भारतावर कोणताही शत्रुत्वपूर्ण हल्ला किंवा कटकारस्थान झाल्यास त्याला प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्याची क्षमता भारतीय सैन्याकडे आहे. कारगिल विजय हा भारतीय सैनिकांच्या शौर्य, धैर्य आणि सर्वोच्च बलिदानाचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले.
भारत विकासाच्या तर पाक दहशतवादाच्या मार्गावर
राजनाथ सिंह यांनी सांगितले की, भारत नवकल्पना, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि अंतराळ संशोधनाच्या माध्यमातून प्रगती करत आहे. भारत सेमीकंडक्टर उद्योग, स्टार्टअप्स, उपग्रह तंत्रज्ञान आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये वेगाने पुढे जात आहे. याउलट पाकिस्तान दहशतवाद, कट्टरतावाद आणि सीमापार घुसखोरीला प्रोत्साहन देत आहे. भारताचा मार्ग विकासाचा आहे, पाकिस्तानचा मार्ग दहशतवादाचा आहे.