पुढारी ऑनलाईन डेस्क : " कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा लोकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही कृतीला प्रोत्साहन देत नाही, असे आमचे मत आहे. जर अशा पद्धतीने फटाके जाळले गेले तर नागरिकांच्या आरोग्याच्या मूलभूत अधिकारावरही परिणाम होतो," असे निरीक्षण आज (दि.११) सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील प्रदूषणाबाबतच्या खटल्याची सुनावणी करताना नोंदवले. फटाक्यांवर कायमस्वरूपी, देशव्यापी बंदी का नाही, असा सवालही न्यायालयाने यावेळी केला.
राजधानी दिल्लीत वायू प्रदूषण हा वर्षभराचा मुद्दा असतो; पण येथे केवळ विशिष्ट महिन्यांतच निर्बंध लागू केले जातात. फक्त काही महिनेच निर्बंध का? वर्षभर हवेचे प्रदूषण वाढते! फटाके तयार करणे, विक्री करणे आणि फोडणे यावर केवळ ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यानच निर्बंध का लागू केले जातात, अशी विचारणा न्यायमूर्ती अभय ओक आणि ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने केली.
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी स्पष्ट केले की, "सध्याचा आदेश सणासुदीच्या काळात वायू प्रदूषणावर केंद्रित आहे. ज्या महिन्यांत दिल्लीतील वायू प्रदूषण वाढते. यावर न्यायालयाने 14 ऑक्टोबर रोजी दिलेल्या दिल्ली सरकारच्या आदेशाचीही छाननी केली, ज्याने फटाक्यांच्या उत्पादनावर आणि विक्रीवर बंदी घातली होती परंतु निवडणुका आणि लग्नासारख्या कार्यक्रमांना अपवाद दिला होता. यावर ताशेरे ओढत खंडपीठाने बंदीचा आदेश काढण्यात झालेल्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "तुमच्या आदेशात निवडणुका, लग्न वगैरेसाठी फटाके फोडले जाऊ शकतात? तुमच्या मते संबंधित कोण आहेत?", असा सवालही केला.
फटाके विक्रीसाठी परवाने दिले जात आहेत का, असा सवाल करत पूर्ण बंदी असताना अशा परवान्यांना परवानगी देऊ नये, असेही खंडपीठाने सुनावले. तसेच दिल्ली पोलीस आयुक्तांना फटाक्यांवर बंदीची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विशेष सेल तयार करावा. तसेच दिल्ली पोलिस आयुक्तांना फटाक्यांच्या बंदी लागू करण्यासाठी त्यांनी उचललेल्या पावलांची नोंद ठेवणारे वैयक्तिक शपथपत्र दाखल करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले.
"जर कोणाला फटाके फोडण्याचा मूलभूत अधिकार सांगायचा असेल, तर त्यांनी न्यायालयात यावे!, असे खडेबोल सुनावत फटाक्यांवर वर्षभर बंदी असली पाहिजे, केवळ दिवाळीच नाही," अशी टिप्पणीही न्यायमूर्ती अभय ओक आणि ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने न्यायालयाने केली. फटाक्यांमुळे दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक आहे. बंदी असतानाही दिवाळीच्या मुहूर्तावर फोडले. राजधानीतील हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांपासून 'अत्यंत खराब' श्रेणीत राहिली आहे.