लखनौ : कोणालाही रस्त्यावर नमाज पठण करू दिले जाणार नाही. प्रेमाने ऐकले तर ठीक; अन्यथा दुसरा मार्ग अवलंबला जाईल, असा कठोर इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बकरी ईदच्या एक आठवडा आधी दिला आहे.
येथे सोमवारी आयोजित एका कार्यक्रमात योगी म्हणाले, नमाज अदा करायची असेल तर ठरलेल्या ठिकाणी करा. संख्या जास्त असेल तर शिफ्टमध्ये अदा करा. आम्ही नमाज थांबवणार नाही. मात्र, रस्त्यावर त्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. रस्ते नमाज अदा करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारची गर्दी जमवण्यासाठी नाहीत. रस्ते हे सामान्य लोकांसाठी चालण्यासाठी आहेत. कोणीही येऊन वाहतुकीत अडथळा निर्माण करावा, हा अधिकार कोणालाही नाही.
सर्वांना कायद्याचे राज्य मान्य करावे लागेल. नियम प्रत्येकासाठी एकसमान आहेत. कोणालाही विशेषाधिकार बहाल केला जाणार नाही, असेही योगी यांनी बजावले.