चेन्नई : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारतासाठी एक अभिमानास्पद क्षण असल्याचे म्हटले आहे. या कारवाईदरम्यान भारतात कोणतेही नुकसान झाल्याचे विदेशी माध्यमांचे दावे फेटाळून लावताना, त्यांनी टीकाकारांना एक खुले आव्हान दिले आहे. भारताचे नुकसान झाल्याचा एक फोटो तरी दाखवा - अगदी एक फुटलेले तावदान तरी दाखवा, असे म्हणत त्यांनी सर्व आरोप खोडून काढले.
आयआयटी मद्रासच्या 62 व्या दीक्षान्त समारंभात बोलताना डोवाल यांनी या कारवाईची अचूक माहिती दिली. ते म्हणाले, भारतीय हवाई दलाने केवळ 23 मिनिटांत सीमेपासून दूर, पाकिस्तानच्या हद्दीत घुसून 9 निश्चित दहशतवादी तळांना लक्ष्य केले. आमचा एकही निशाणा चुकला नाही आणि आम्ही इतरत्र कुठेही हल्ला केला नाही. या कारवाईत स्वदेशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने प्रत्युत्तरादाखल 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते. यानंतर पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, जो भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने पूर्णपणे निष्फळ ठरवला.