नवी दिल्लीः कझाकिस्तान विमान अपघातात भारतीय प्रवाशी असल्याची अद्याप पुष्टी झाली नसल्याचे, परराष्ट्र मंत्रालयाचे सूत्रांनी सांगितले. या अपघातात मृत्यू झालेल्या किंवा विमानातील प्रवाशांमध्ये भारतीय नागरिक आहे का? याबद्दल विचारले असता मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मात्र, या विमान अपघाताबद्दल भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप अधिकृत काही माहिती जारी केलेली नाही.
रशियाच्या बाकूहून ग्रोझनीला जाणारे अझरबैजान एअरलाइन्सचे विमान बुधवारी, कझाकिस्तानमधील अकताऊ शहराजवळ कोसळले. रशियन वृत्तसंस्थांनी सांगितले की, ग्रोझनीमध्ये धुक्यामुळे विमानाचा मार्ग बदलला होता. अझरबैजान एअरलाइन्सच्या फ्लाइट ८२४३ मध्ये ६२ प्रवासी आणि पाच क्रू सदस्य होते. “प्रवाशांमध्ये ३७ अझरबैजानी नागरिक, १६ रशियन नागरिक, ६ कझाक नागरिक आणि ३ किर्गिझ नागरिकांचा समावेश आहे,” असे अझरबैजान एअरलाइन्सने ' पोस्ट केले आहे. यांपैकी कमीत कमी २९ जणांचा जीव वाचला असल्याचे समजते.