Nitish Kumar Oath Ceremony : नितीश कुमार यांनी आज (दि. २०) दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदानात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यानंतर सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. ते दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप आणि एनडीएच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी २४ अन्य मंत्र्यांना शपथ दिली.
बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआने २४३ पैकी २०७ जागांवर विजय मिळवला. नितीश कुमार यांनी बुधवारी (दि. १९) बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची भेट घेतली. आपला राजीनामा सादर करून नवीन सरकार स्थापनेचा दावा केला. रालोआने बिहारमध्ये दुसर्यांना २०० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. यापूर्वी २०१० मध्ये त्यांनी २०६ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्त्वाखालील महाआघाडीला केवळ ३५ जागांवर समाधान मानावे लागले.
सम्राट चौधरी, विजय सिन्हा, विजय चौधरी, विजेंद्र प्रसाद यादव, श्रवण कुमार, अशोक चौधरी, लेशी सिंह, मदन सहनी, नितीन नवीन, रामकृपाल यादव, संतोष सुमन, सुनील कुमार, जमा खान, संजय सिंह टायगर, अरुण शंकर प्रसाद, सुरेंद्र मेहता, नारायण प्रसाद, रमा निषाद, लखेंद्र कुमार रोशन, श्रेयसी सिंह, प्रमोद कुमार, संजय कुमार सिंह, दीपक प्रकाश यांना नितीश कुमारांच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद देण्यात आले आहे.
७४ वर्षीय नितीश कुमार यांनी नोव्हेंबर २००५ पासून राज्याचे मुख्यमंत्री आहेत. याला अपवाद २०१४-१५ मधील केवळ नऊ महिन्यांचा कालंखड आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही नितीश कुमार यांच्यासाठी एक महत्त्वाची परीक्षा म्हणून पाहिली जात होती. त्यांनी रालोआला अभूतपूर्व यश मिळवून देत पुन्हा एकदा सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळवले. जद(यू)चे प्रमुख नितीश कुमार यांची बुधवारी पाटणा येथे झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ गटाचे नेते म्हणून निवड झाली होती.