नितीश कुमार. pudhari.
राष्ट्रीय

Nitish Kumar resignation | नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

Nitish Kumar resignation | बिहारमधील नव्या सरकारला माझे मार्गदर्शनाची ग्‍वाही

पुढारी वृत्तसेवा

Nitish Kumar Resignation

पाटणा : बिहारच्या राजकारणातील दिग्गज नेते नितीश कुमार यांनी आज (दि. १४) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यासोबतच बिहारमधील त्यांच्या २० वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळास पूर्णविराम मिळाला असून, नितीश कुमार यांची आता राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली असून, त्यांच्या राजीनाम्यानंतर बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर अवघ्‍या पाच महिन्‍यांत निर्णय

नितीश कुमार यांनी पाटणा येथील लोकभवनात राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. जेडीयू-भाजप युतीला (एनडीए) विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर अवघ्या पाच महिन्यांतच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेतली. त्यांच्या या पावलामुळे बिहारमध्ये आता पहिल्यांदाच भाजपचे सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

'नव्या सरकारला माझे पूर्ण सहकार्य'

राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधताना नितीश कुमार म्हणाले की, "आमच्या सरकारने शिक्षण, आरोग्य, वीज यांसह सर्वच क्षेत्रांत समाजातील प्रत्येक घटकासाठी काम केले. विशेषतः महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणावर आम्ही भर दिला. नवे सरकार ही जबाबदारी पुढे नेईल आणि त्यांना माझे पूर्ण सहकार्य व मार्गदर्शन लाभेल."

आम्ही विकासासाठी कटिबद्ध राहिलो

नितीश कुमार यांनी आपल्या प्रवासाचा आढावा घेताना म्‍हटलं आहे की, "२४ नोव्हेंबर २००५ रोजी आम्ही राज्यात पहिल्यांदा एनडीएचे सरकार स्थापन केले. तेव्हापासून राज्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले असून आम्ही विकासासाठी कटिबद्ध राहिलो. हिंदू, मुस्लिम, सवर्ण, मागास, अतिमागास, दलित आणि महादलित अशा सर्वच घटकांच्या हितासाठी आम्ही काम केले आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे

"२०२५ ते २०३० या काळासाठी आम्ही ‘७ निश्चय-३’ हे धोरण आखले आहे, जे बिहारला प्रगतीकडे नेईल. बिहारच्या विकासासाठी केंद्र सरकारने नेहमीच पाठबळ दिले असून, त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे. बिहार वेगाने प्रगती करत देशातील आघाडीच्या राज्यांमध्ये स्थान मिळवेल, असा मला विश्वास आहे, असेही त्‍यांनी नमॅद केले.

दोन दशकांचा राजकीय प्रवास नेहमीच चर्चेत

नितीश कुमार यांनी २४ नोव्हेंबर २००५ रोजी पहिल्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. २०१० मध्ये मोठ्या बहुमताने पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांनी पायाभूत सुविधा आणि कायदा व सुव्यवस्थेवर भर देऊन बिहारची 'मागास राज्य' ही ओळख पुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा २० वर्षांचा प्रवास राजकीय धरसोडीसाठीही तितकाच चर्चेत राहिला. २०१३ मध्ये भाजपशी नाते तोडणे, २०१५ मध्ये आरजेडी-काँग्रेससोबत महाआघाडी करणे, २०१७ मध्ये पुन्हा एनडीएमध्ये परतणे, २०२२ मध्ये पुन्हा महाआघाडीत जाणे आणि शेवटी पुन्हा भाजपशी हातमिळवणी करणे, अशा त्यांच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे विरोधकांनी त्यांच्यावर 'पलटू राम' अशी बोचरी टीकाही केली. आता राज्याच्या सक्रिय राजकारणातून नितीश कुमार दिल्लीच्या राजकारणातप्रवेश करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT