पाटणा : आपल्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत, जेव्हा-जेव्हा टीकाकार आणि विरोधकांनी त्यांना राजकीयद़ृष्ट्या संपले असे मानले, तेव्हा-तेव्हा नितीश कुमार यांनी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचे विलक्षण कौशल्य दाखवले आहे. नितीश कुमार यांचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहिलेल्या 10 नेत्यांमध्ये समावेश असून ते आठव्या स्थानी आहेत.
मंडल-पश्चात राजकारणामुळे उदयास आलेल्या नेत्यांपैकी नितीश कुमार हे एक वेगळे व्यक्तिमत्त्व आहेत. समाजवादी विचारधारेतून आलेल्या बहुतेक नेत्यांप्रमाणे नसून, त्यांनी प्रशासकीय उणीव भरून काढण्याच्या क्षमतेमुळे आपली ओळख निर्माण केली. शिक्षण पूर्ण केलेले अभियंता असलेल्या नितीश यांनी जेपी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी राज्य वीज विभागाकडून आलेली नोकरीची ऑफर नाकारली आणि राजकीय डाव खेळण्याचा निर्णय घेतला. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनातील त्यांचे सहकारी लालूप्रसाद आणि रामविलास पासवान यांच्या विपरीत, निवडणुकीतील यश त्यांना बराच काळ हुलकावणी देत होते. तीन वेळा पराभव पत्करावा लागल्यानंतर, 1985 च्या विधानसभा निवडणुकीत लोक दलाचे उमेदवार म्हणून हरनौत मतदारसंघातून त्यांना विजयाची पहिली चव चाखायला मिळाली.
सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहणारे टॉप 10 नेते
1. सिक्कीम : पवन कुमार चामलिंग (25 वर्षांहून अधिक) 12 डिसेंबर 1994 - 26 मे 2019
2. ओडिशा : नवीन पटनायक (24 वर्षांहून अधिक) 5 मार्च 2000 - 11 जून 2024
3. पश्चिम बंगाल : ज्योती बसू (23 वर्षांहून अधिक) 21 जून 1977 - 5 नोव्हेंबर 2000
4. अरुणाचल प्रदेश : गेगाँग अपांग (22 वर्षांहून अधिक) 18 जानेवारी 1980 - 19 जानेवारी 1999; 3 ऑगस्ट 2003 - 9 एप्रिल 2007
5. मिझोराम : लाल थनहवला (22 वर्षांहून अधिक) 5 मे 1984 - 21 ऑगस्ट 1986; 24 जानेवारी 1989 - 3 डिसेंबर 1998; 11 डिसेंबर 2008 - 15 डिसेंबर 2018
6. हिमाचल प्रदेश : वीरभद्र सिंह (21 वर्षांहून अधिक) 8 एप्रिल 1983 - 5 मार्च 1990; 3 डिसेंबर 1993 - 24 मार्च 1998; 6 मार्च 2003 - 30 डिसेंबर 2007; 25 डिसेंबर 2012 - 27 डिसेंबर 2017
7. त्रिपुरा : माणिक सरकार (19 वर्षांहून अधिक) 11 मार्च 1998 - 9 मार्च 2018
8. बिहार : नितीश कुमार (सुमारे 19 वर्षे) 3 मार्च 2000 ते 11 मार्च 2000; 24 नोव्हेंबर 2005 ते 20 मे 2014, आणि 22 फेब्रुवारी 2015 ते 19 नोव्हेंबर 2025
9. तामिळनाडू : एम. करुणानिधी (18 वर्षांहून अधिक) 10 फेब्रुवारी 1969 - 31 जानेवारी 1976; 27 जानेवारी 1989 - 30 जानेवारी 1991; 13 मे 1996 - 14 मे 2001; 13 मे 2006 - 16 मे 2011
10. पंजाब : प्रकाश सिंह बादल (18 वर्षांहून अधिक) 27 मार्च 1970 - 14 जून 1971; 20 जून 1977 - 17 फेब्रुवारी 1980; 12 फेब्रुवारी 1997 - 26 फेब्रुवारी 2002; 1 मार्च 2007 - 16 मार्च 2017
13 गायी अन् 10 वासरे
माहितीनुसार नितीश कुमार यांची एकूण संपत्ती 1.64 कोटी रुपये इतकी आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही संपत्ती जवळपास समानच आहे. नितीश कुमार यांच्याकडे स्वतःच्या मालकीच्या 13 गायी आणि 10 वासरं आहेत. हे पशुधन त्यांच्या संपत्तीत स्पष्टपणे लिहिलेलं आहे. त्यांच्या नावावर एक महागडी अचल संपत्ती आहे. दिल्लीच्या द्वारका येथे 1000 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट आहे.
मंत्रिमंडळातील जातीय, प्रादेशिक संतुलन
नितीश कुमार यांचे नवीन मंत्रिमंडळ स्पष्टपणे दाखवत आहे की, एनडीएने जातीय संतुलन साधण्यावर खूप अभ्यास केला आहे. प्रादेशिक ताळमेळही उत्तम साधला आहे.
5 दलितांना मंत्री करून मोठा संदेश
जातीय समीकरणांनुसार, नितीश यांच्या नवीन मंत्रिमंडळात राजपूत-4, भूमिहार-2 आणि ब्राह्मण व कायस्थ प्रत्येकी एक, म्हणजेच एकूण 8 सवर्ण चेहरे आहेत. त्याचबरोबर कुशवाहा-3, कुर्मी-2, वैश्य-2, यादव-2, मुस्लिम-1, मल्लाह-2, दलित-5 आणि अत्यंत मागास प्रवर्गातील एकाला मंत्री बनवण्यात आले आहे. 5 दलितांना मंत्रिपद देऊन असा संदेश देण्यात आला आहे की, पासवान आणि इतर दलित समाजाला सोबत घेऊन भाजप, जद(यू), लोजप आणि हम यांचे एकत्रित दलित राजकारण उभे करायचे आहे.
राजदच्या गडाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न
एनडीएच्या नवीन मंत्रिमंडळात 2 यादव चेहरे आहेत - नितीश यांचे जुने सहकारी सुपौलचे विजेंद्र यादव आणि पाटण्याच्या दानापूरमधून बाहुबली रीतलाल यादव यांचा पराभव करून आलेले रामकृपाल यादव. मोठा राजकीय संदेश देणारे हे समीकरण आहे.
पारंपरिक वैश्य समाजाचाही सन्मान
वैश्य समाजातील 2 चेहर्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. यात किशनगंजमधून येणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल आणि चंपारण भागातील नारायण शाह यांचा समावेश आहे.
मुस्लिम प्रतिनिधित्वाचा महत्त्वाचा संकेत
मुस्लिम समाजातून एकमेव चेहरा जमा खान आहेत, जे कैमूरमधून येतात. मुस्लिम वर्गातून एकमेव मंत्री जद(यू)च्या कोट्यातून ठेवणे हे दर्शवते की, एनडीएमध्ये मुस्लिमांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी अजूनही प्रामुख्याने नितीश कुमार यांच्यावरच अवलंबून आहे.