नवी दिल्ली; पीटीआय : जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या बदलांच्या टप्प्यातून जात आहे, तेव्हा भारताची स्थिती मजबूत आहे. भारतीय अर्थव्यवस्था निर्बंध आणि शुल्कवाढीसारखे बाह्य धक्के सोसण्यास सक्षम आहे, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला.
‘कौटिल्य आर्थिक परिषद 2025’मध्ये आपल्या भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, भूराजकीय संघर्ष तीव्र होत आहेत. निर्बंध, शुल्क आणि विलगीकरणाची धोरणे जागतिक पुरवठा साखळीला नवा आकार देत आहेत. भारतासाठी हे बदल चिंताजनक आहेत; पण त्याचबरोबर ते आपल्या लढाऊ वृत्तीलाही अधोरेखित करतात. बाह्य धक्के सहन करण्याची आपली क्षमता मजबूत आहे आणि आपली आर्थिक क्षमताही विकसित होत आहे, असे त्या म्हणाल्या. भारतीय अर्थव्यवस्था लवचिक आहे आणि स्थिरपणे पुढे वाटचाल करत आहे. 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ बनण्यासाठी आत्मनिर्भरता आवश्यक आहे; परंतु याचा अर्थ असा नाही की, भारताने स्वतःला एक बंदिस्त अर्थव्यवस्था बनवावे.
सीतारामन यांनी सांगितले की, युद्ध आणि सामरिक स्पर्धा या सहकार्य आणि संघर्षाची नव्याने व्याख्या करत आहेत. ज्या आघाड्या एकेकाळी मजबूत दिसत होत्या, त्यांच्यासाठी ही परीक्षेची वेळ आहे. जगात नवीन आघाड्या उदयास येत आहेत. आपण जागतिक अर्थव्यवस्थेत संरचनात्मक बदल होताना पाहत आहोत.