लंडन : वृत्तसंस्था
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याने त्याच्या पुन्हा प्रत्यार्पणाची सुनावणी उघडण्याची मागणी करणारी याचिका वेस्टमिन्स्टर कोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवर २३ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. भारतात प्रत्यार्पण झाल्यावर तपास यंत्रणांकडून आपली चौकशी केली जाईल. त्यामुळे छळ होण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद करत मोदीने कोर्टाकडे हा खटला पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे.
नीरव मोदीने प्रत्यार्पणाविरोधात यूकेच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व कायदेशीर पर्याय वापरले आहेत. पण त्याला यश आलेले नाही. सुमारे ६,४९८ कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळाप्रकरणी सीबीआय आणि ईडी यांसारख्या तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत. भारताकडून 'चौकशी न करण्याची' हमी पुन्हा देण्याची शक्यता मोदीच्या या नव्या युक्तिवादाचा भारतीय तपास यंत्रणांकडून जोरदारपणे प्रतिवाद होण्याची शक्यता आहे. मोदीला भारतात आणल्यानंतर त्याची चौकशी केली जाणार नाही, फक्त कायद्यानुसार खटल्याला सामोरे जावे लागेल, अशी लेखी हमी भारत सरकार पुन्हा एकदा लंडन कोर्टाला देऊ शकते.
तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आरोपपत्र आधीच दाखल झाले आहे आणि तपास जवळजवळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे मोदीची नव्याने चौकशी करण्याची गरज नाही. प्रत्यार्पण झाल्यास त्याला मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातील सुरक्षित बराक क्रमांक १२ मध्ये ठेवले जाईल, जिथे गैरवर्तन किंवा हिंसेचा धोका नाही, अशी ग्वाही भारताने यापूर्वीच यूके सरकारला दिली आहे. नीरव मोदीवर पीएनबी फसवणूक, मनी लाँडरिंग आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न अशा तीन गंभीर गुन्हेगारी खटल्यांचा सामना करण्याची वेळ आली आहे. मार्च २०१९ पासून तो लंडनच्या तुरुंगात असून त्याचा 'पळून जाण्याचा धोका' लक्षात घेऊन त्याचे अनेक जामीन अर्ज फेटाळले आहेत