न्यूयॉर्क/नवी दिल्ली; वृत्तसंस्था : स्वत:ला आणि कुटुंबीयांना दीर्घकालीन आणि खर्चिक खटल्यापासून वाचवण्यासाठी व खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नून याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या 54 वर्षीय निखिल गुप्ता याने अमेरिकन न्यायालयात आपला गुन्हा मान्य केला. मर्डर फॉर हायर (पैसे देऊन हत्या करणे) आणि मनी लाँडरिंग यांसारख्या गंभीर कलमांखाली त्याने ही कबुली दिली, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता याच्या या निर्णयामुळे त्यांच्या पत्नी आणि आईला मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईमुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली असून त्यांना खासगी वकील बदलून सरकारी वकिलाची मदत घ्यावी लागली होती. कुटुंबावर होणारा मानसिक आणि आर्थिक परिणाम पाहून गुप्ता याने सर्व जबाबदारी स्वतःवर घेत हा लढा संपवण्याचा मार्ग निवडल्याचे समजते.
निखिल गुप्ता याला 30 जून 2023 रोजी झेक प्रजासत्ताकमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर जून 2024 मध्ये त्याचे अमेरिकेत प्रत्यार्पण झाले. अमेरिकन तपास यंत्रणांचा असा आरोप आहे की, गुप्ता याने एका भारतीय सरकारी अधिकार्याच्या सांगण्यावरून पन्नूनच्या हत्येचा कट रचला होता. भारत सरकारने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून अशा प्रकारच्या कारवायांना सरकारचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे.
शिक्षा : गुन्हा मान्य केल्यामुळे निखिल गुप्ता याला आता जास्तीत जास्त 40 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
आर्थिक चणचण : कायदेशीर लढाईत सर्व पैसे खर्च झाल्यामुळे कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सरकारी मदत नाही : कुटुंबाच्या दाव्यानुसार, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यांना अद्याप कोणतीही कायदेशीर मदत मिळालेली नाही.
पुढील सुनावणी : गुप्ता याच्या शिक्षेवर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे.