राष्ट्रीय

NIA Kolkata Operation : कोलकातामध्ये एनआयएची मोठी कारवाई; पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या झफर रियाझच्या मुसक्या आवळल्या

भारतीय व्हॉट्सॲप नंबरचा गैरवापर केल्याचा खळबळजनक खुलासा

पुढारी वृत्तसेवा

कोलकाता : देशाच्या सुरक्षेला सुरुंग लावण्याचा एक मोठा डाव राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) उधळून लावला आहे. भारतीय सुरक्षेशी संबंधित अत्यंत संवेदनशील आणि गुप्त माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला पुरवल्याप्रकरणी 'NIA'ने कोलकाता येथून झफर रियाझ उर्फ रिझवी या संशयित आरोपीला अटक केली आहे. आरोपीने केवळ पैशांच्या हव्यासापोटी आणि पाकिस्तानी नागरिकत्वाच्या आमिषाला बळी पडून देशाशी गद्दारी केल्याचा गंभीर आरोप तपास यंत्रणेने ठेवला आहे. या अटकेमुळे भारतविरोधी हेरगिरी करणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झाला असून सुरक्षा वर्तुळात खळबळ उडाली आहे.

'NIA'ने केलेल्या प्राथमिक तपासात या हेरगिरीच्या कटाची अनेक धक्कादायक पाळेमुळे समोर आली आहेत. आरोपी झफर रियाझ हा गेल्या वीस-पपंचवीस वर्षांपासून म्हणजेच २००५ सालापासून सातत्याने भारत आणि पाकिस्तान दरम्यान संशयास्पद दौरे करत होता. या वारंवार होणाऱ्या प्रवासादरम्यानच तो पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या थेट संपर्कात आला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्याला मोठी आर्थिक रक्कम देण्याचे आमिष दाखवले, तसेच पाकिस्तानचे नागरिकत्व देण्याचे प्रलोभनही दिले. या मोबदल्यात त्याला भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेविषयीची अत्यंत गोपनीय माहिती गोळा करून ती पाकिस्तानात पोहोचवण्याचे काम सोपवण्यात आले होते आणि तो हे काम अव्याहतपणे करत होता.

या संपूर्ण हेरगिरीच्या रॅकेटमध्ये आरोपीने वापरलेली कार्यपद्धती अत्यंत धक्कादायक आहे. आरोपी झफर रियाझ याने भारतीय मोबाईल नंबरचे OTP पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना पुरवले होते. या भारतीय ओटीपीच्या मदतीने पाकिस्तानातून थेट भारतीय क्रमांकांवर 'व्हॉट्सॲप' अकाउंट्स सक्रिय करण्यात आली. अशा प्रकारे भारतात सक्रिय दाखवून प्रत्यक्षात पाकिस्तानातून चालवल्या जाणाऱ्या या छुप्या आणि सुरक्षित व्हॉट्सॲप अकाउंट्सच्या माध्यमातूनच पाकिस्तानी अधिकारी आणि भारतातील देशविघातक घटकांमध्ये अत्यंत गुप्त संवाद साधला जात असल्याचा मजबूत दावा 'NIA'ने केला आहे.

देशाच्या अखंडतेला आणि सुरक्षेला थेट आव्हान देणाऱ्या या कृत्यामुळे आरोपी झफर रियाझ याच्यावर अत्यंत कडक कायदेशीर कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट (शासकीय गुपिते कायदा) आणि युएपीए (UAPA - बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या रॅकेटच्या मागे आणखी कोणकोणते बडे चेहरे कार्यरत आहेत, भारतातील इतर राज्यांमध्ये ही जाळी कुठे पसरलेली आहे, आणि आरोपीने आतापर्यंत नेमकी कोणती संवेदनशील माहिती पाकिस्तानला लीक केली आहे, या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कटाचा कसून तपास आता 'NIA'चे वरिष्ठ अधिकारी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT