Delhi Car Blast | उमरच्या जवळच्या साथीदाराला एनआयएकडून अटक; लष्करी वापरासाठीचा दारूगोळा स्फोटस्थळी कसा पोहोचला? 
राष्ट्रीय

Delhi Car Blast | उमरच्या जवळच्या साथीदाराला एनआयएकडून अटक; लष्करी वापरासाठीचा दारूगोळा स्फोटस्थळी कसा पोहोचला?

लाल किल्ला स्फोट प्रकरणातील नऊ एमएम कॅलिबरची काडतुसे जप्त

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : नवी दिल्लीतील लाल किल्ला परिसराजवळील कार स्फोट प्रकरणाच्या तपासात घटनास्थळावरून जप्त केलेली तीन काडतुसे (दोन जिवंत आणि एक रिकामे) 9 एमएम कॅलिबरची आहेत. लष्करासाठी वापरल्या जाणार्‍या या गोळ्या नागरिकांच्या ताब्यात ठेवण्यास प्रतिबंधित आहे. दरम्यान, 10 डिसेंबरला घडलेल्या स्फोटासाटी वापरलेली गाडी उमर नबीच चालवत असल्याचे डीएनए चाचणीवरून स्पष्ट होत आहे. या स्फोटासाठी उमर नबीला कार घेऊन देणारा आमीर रशीद अली याला एनआयएने ताब्यात घेतले. एनआयएने हा आत्मघाती दहशतवादी हल्ला असल्याचे रविवारी स्पष्ट केले.

एनआयएने आतापर्यंत जखमींसह 73 साक्षीदार तपासले आहेत. आमीर कार खरेदी करून देण्यासाठी काश्मिरातील पंपोरे येथून दिल्लीत आला होता. त्याला आत्मघाती स्फोटाची कल्पना होती. स्फोटानंतर काही तासांतच जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांच्याकडून एनआयएने ताबा मिळवला. एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले की, या काडतुसांचा वापर सहसा सशस्त्र दलांकडून किंवा विशेष परवानगी असलेल्या व्यक्तींकडूनच केला जातो. घटनास्थळी कोणतेही पिस्तूल किंवा त्याचे कोणतेही भाग आढळले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा दारूगोळा स्फोटस्थळी कसा पोहोचला आणि संशयितांच्या ताब्यात तो होता का, याचा तपास आता अधिकारी करत आहेत. या नव्या खुलाशामुळे तपासाला एक नवीन दिशा मिळाली आहे.

डीएनए चाचणीत उमर नबीच गाडी चालवत असल्याचे स्पष्ट

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबरला झालेल्या कार स्फोटात गाडी चालवणारी व्यक्ती उमर नबीच होती, हे न्यायवैद्यक पुराव्यांनी निश्चित केले आहे. या भीषण स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जखमी झाले होते. गाडीच्या एक्सलरेटरजवळ जळालेला पायाचा काही भाग आणि गाडीच्या ढिगार्‍याजवळ सापडलेला एक काळा स्पोर्ट शू या महत्त्वपूर्ण पुराव्यांवर तपासकर्त्यांनी भर दिला. स्फोटात ह्युंदाई आय-20 कार पूर्णपणे नष्ट झाली होती. फॉरेन्सिक पथकांना चालकाच्या बाजूला सापडलेल्या पायाच्या खालच्या भागाचे डीएनए नमुने तपासणीसाठी एम्स येथे पाठवले होते. बुधवारी झालेल्या तपासणीत हे नमुने उमरच्या आईच्या नमुन्यांशी जुळले, ज्यामुळे तोच गाडी चालवत असल्याचे निश्चित झाले आहे. स्फोटाच्या ठिकाणी मिळालेला स्पोर्ट शू हा उमरने त्या दिवशी लाल किल्ल्याकडे जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये परिधान केलेल्या बुटाशी जुळत होता. हा पुरावा महत्त्वाचा आहे. कारण स्फोटाच्या वेळी उमरच 20 चालवत होता हे वैज्ञानिकरीत्या सिद्ध होते, असे सूत्रांनी सांगितले.

डॉक्टरांची नोंदणी रद्द

या प्रकरणाशी संबंधित घडामोडींमध्ये नॅशनल मेडिकल कमिशनने जम्मू-काश्मीरमधील चार डॉक्टरांची नोंदणी तत्काळ प्रभावाने रद्द केली आहे. डॉ. मुझफ्फर अहमद, डॉ. आदिल अहमद राथर, डॉ. मुजम्मिल शकील आणि डॉ. शाहीन सईद यांचा त्यात समावेश आहे. डॉ. आदिल अहमद राथर, डॉ. मुजम्मिल शकील आणि डॉ. शाहीन सईद यांना यापूर्वीच दहशतवादी प्रकरणांशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तपास यंत्रणांनी खुलासा केला आहे की, जवळपास आठ संशयित आरोपी चार वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी स्फोट घडवण्याच्या तयारीत होते. प्रत्येकाकडे अनेक सुधारित स्फोटक उपकरणे होती.

प्रमुख घडामोडी

1) स्फोटाचे स्वरूप : 10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळील स्फोटात 12 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी झाले.

2) नवीन एफआयआर : घटनेच्या आदल्या दिवशीच गुन्हेगारी कट अंतर्गत नवीन एफआयआर नोंदवण्यात आला.

3) सुरक्षा वाढवली : ऐतिहासिक स्मारकाच्या आसपासची सुरक्षा व्यवस्था या घटनेनंतर अधिक कडक करण्यात आली.

4) मुख्य सूत्रधार : डॉ. उमर नबी यानेच हा कार स्फोट घडवल्याचे डीएनए चाचणीतून निश्चित झाले असून त्याचे डीएनए नमुने त्याच्या आईच्या डीएनएशी जुळले आहेत.

लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे आता सर्व दरवाजे खुले

लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेले लाल किल्ला मेट्रो स्टेशन आता पूर्णपणे उघडण्यात आले आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) रविवारी ही घोषणा केली. त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणाहून प्रवाशांची वर्दळ दिसू लागली आहे. परिस्थिती सामान्य होत आहे. सध्या लाल किल्ला परिसरातील बॅरिकेडस्ही हटवण्यात आले आहेत. 10 नोव्हेंबरला लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट झाला. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. रविवारी ते उघडण्यात आले. यापूर्वी शनिवारी दोन दरवाजे उघडण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT