लखनौ, वृत्तसंस्था : शत्रूच्या विरोधात मदिरा व मदिराक्षी ही शस्त्रे क्षेपणास्त्रांहून कमी घातक नसतात, हे पाकिस्तानला चांगलेच उमगलेले दिसते. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडून (आयएसआय) फेसबुक, व्हॉटस् अॅप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, लिंक्डइनवर अनेक बनावट प्रोफाईल्स बनवण्यात आल्या असून 14 सौंदर्यवतींचे फोटो वापरून भारतीय अधिकार्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याची नव्याने तयारी केलेली आहे.
उत्तर प्रदेशच्या गुप्तचर विभागाने पाकिस्तानचा हा कट उघडकीस आणला असून पोलिसांकडूनही यासंदर्भात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याआधीही अनेक सायबर हल्ले पाकिस्तानातून झालेले आहेत. अशा हल्ल्यांत सुंदर ललनांचा वापर अधिकार्यांना आमिष म्हणून झालेला आहे. पुण्यात घडलेले असेच एक प्रकरण सध्या चर्चेत आहे. एका शास्त्रज्ञच त्यात सावज बनला.
पाकिस्तान आणखी एका मोठ्या सायबर हल्ल्याच्या तयारीत आहे. या हल्ल्यातही ललनांचाही वापर पाक करणार आहे. गुप्तचर विभागाकडून राज्याच्या सर्व जिल्हाधिकार्यांना आणि आयुक्तांना ही माहिती देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाने या ललनांच्या सर्व बनावट प्रोफाईल्सही माहितीसाठी जारी केल्या आहेत.
भारतीय मोबाईल क्रमांकांचा वापर
आयएसआयने सोशल मीडियावर सुंदर सुंदर मुलींचे फोटो आणि भारतीय मोबाईल क्रमांक वापरून भारतीय (मुलींच्या) नावांनी प्रोफाईल्स तयार केल्या आहेत. प्रत्येक प्रोफाईलच्या फ्रेंड लिस्टमध्ये बहुतांशी भारतीय लष्करातील लोक आणि भारतीय पोलिस दिसतात. त्यामुळे या अकाऊंटवरून आलेल्या रिक्वेस्टला संबंधित विभागातील लोक बळी पडण्याची शक्यता बळावते.
गुप्तचर विभागाने जिल्हाधिकार्यांना पाठवलेल्या पत्रात या सर्व प्रोफाईल्सच्या लिंक आणि त्या ज्या क्रमांकावरून बनवल्या आहेत, ते मोबाईल क्रमांक नमूद करण्यात आले आहेत. या पत्रानंतर उत्तर प्रदेशातील पोलिस अलर्ट मोडवर आले आहेत.
आयएसआयच्या रडारवर कोण कोण?
* आयएसआयच्या रडारवर भारतीय लष्कर, निमलष्करी दल, राज्य पोलिस अधिकारी आणि शास्त्रज्ञच आहेत.
* या सर्वांना 'हुस्न के जाल में' फसविण्यासाठी पाकने बनविलेल्या 14 ललनांच्या प्रोफाईल्सची जंत्रीही भारतीय यंत्रणेच्या हाती लागली आहे.