अनिल साक्षी
जम्मू : नव्या वर्षात यात्रा व्यवस्थापन अधिक चांगले करण्याच्या नावाखाली माता वैष्णोदेवी देवस्थान बोर्डाने येणार्या भाविकांवर अनेक प्रकारचे निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे. बोर्डाच्या या निर्णयांबाबत कुठे नाराजी तर कुठे समाधानाचे वातावरण आहे; मात्र बोर्डाचा दावा आहे की, हे सर्व बदल यात्रेच्या हितासाठीच आहेत.
गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी देवस्थानने काही बदल केले आहेत. नव्या निर्बंधांनुसार, भाविकांनी नोंदणीनंतर 24 तासांच्या आत माता वैष्णोदेवीची यात्रा पूर्ण करणे बंधनकारक असेल. बोर्डाचा दावा आहे की, कटरा ते माता वैष्णो देवी मंदिर परिसरापर्यंत भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
24 तासांत बाणगंगा येथे रिपोर्ट द्यावा लागेल
यासोबतच, बोर्डाने सर्व भाविकांना सूचना दिली आहे की, जे भाविक बाणगंगा येथून पायी यात्रा सुरू करतात, त्यांनी 24 तासांच्या आत पुन्हा बाणगंगाला रिपोर्ट द्यावा लागेल. त्यामुळे जर तुम्ही या नव्या वर्षात श्री माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल, तर आपल्या प्रवासाच्या वेळापत्रकावर पुन्हा एकदा नजर टाकणे गरजेचे आहे.
नव्या वर्षात आणि त्यानंतर होणारी भाविकांची प्रचंड गर्दी अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्यासाठी हे बदल केले आहेत. बोर्डाचा दावा आहे की, या मार्गदर्शक सूचनांनंतर यात्रेकरू समाधानी आहेत. काही भाविकांनी सांगितले की, नवे नियम यात्रा अधिक सुव्यवस्थित करतील. काही ठिकाणी नाराजीही व्यक्त केली जात आहे. याशिवाय, माता वैष्णोदेवी मंदिर परिसर ते भैरों घाटी दरम्यानच्या रोपवे तिकिटांसाठीही वेळ निश्चित करण्यात आली आहे. आता जे भाविक रोपवेचे तिकीट घेतील, त्यांना 2 तासांच्या आत भैरों घाटीची यात्रा पूर्ण करावी लागेल.