Crime News
मध्य प्रदेश : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून झालेल्या राजकीय चर्चेतून झालेल्या टोकाच्या वादानंतर मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात एका २२ वर्षीय तरुणाची त्याच्या मामांनीच कथितरित्या हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपी मामांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅन्ट पोलिस स्टेशन हद्दीतील पोलीस लाइन्सच्या बांधकाम सुरू असलेल्या आवारात ही घटना सोमवारी घडली. बिहारमधील शिवहर जिल्ह्यातील रहिवासी असलेला शंकर मांझी (वय २२) हा मजूर, त्याचे मामा राजेश मांझी (वय २५) आणि तुफानी मांझी (वय २७) यांच्यासोबत तिथे राहत होता. तिघेही येथे मजुरीचे काम करत होते.
पोलिस स्टेशनचे प्रभारी अनुप भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, मयत शंकर हा राष्ट्रीय जनता दलाचा (RJD) समर्थक होता, तर त्याचे मामा राजेश आणि तुफानी हे जनता दल (युनायटेड) JD(U) चे समर्थक होते. घटनेच्या रात्री तिघांनी एकत्र मद्यपान केले होते. यावेळी बिहारच्या निवडणुकीच्या निकालावरून त्यांच्यात जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली. या चर्चेचे रूपांतर दारूच्या नशेत शाब्दिक बाचाबाचीत झाले आणि नंतर याचे पर्यवसान हाणामारीत झाले.
वादाचे स्वरूप गंभीर झाल्यावर, आरोपी राजेश आणि तुफानी यांनी शंकरला जवळच्या चिखलाच्या भागात ओढत नेले आणि त्याला खाली दाबून ठेवले. यात श्वास गुदमरून किंवा अन्य कारणाने शंकरचा मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने शंकरला जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी राजेश आणि तुफानी या दोघांनाही ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान, दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. राजकीय मतभेद आणि दारूच्या नशेत झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.