नवी दिल्ली : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे किमान ३२० भारतीय बेपत्ता आहेत आणि सुमारे ४०० जण चीनच्या बाजूला अडकले आहेत. नेपाळच्या बचावकार्यात शक्य ती सर्व मदत करण्यास भारत तयार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, चीनच्या बाजूला अडकलेले ९६ भारतीय नागरिक जमिनीमार्गे सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले आहेत. नेपाळमधील पूरग्रस्त भागातून काठमांडूला पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी २१ भारतीय नवी दिल्लीत दाखल झाले, असे त्यांनी सांगितले. तामिळनाडूतील या भारतीय नागरिकांचे राजधानीतील विमानतळावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्वागत केले.
ज्या भारतीय नागरिकांशी आमचा संपर्क होऊ शकलेला नाही किंवा जे बेपत्ता आहेत, त्यांची संख्या सध्या ३२० इतकी आहे, असे जयस्वाल म्हणाले. भारतीय वंशाचे सुमारे १०० लोकही असे आहेत, ज्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. हे भारतीय वंशाचे लोक आहेत, जे कदाचित कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले असावेत. परंतु त्यांच्याकडे इतर देशांचे नागरिकत्व आहे, असे त्यांनी सांगितले.
नेपाळच्या गरजेनुसार भारत आणखी मदत पाठवण्याच्या तयारीत आहे. शुक्रवारी सायंकाळी तिसरे विशेष विमान रवाना होण्याची शक्यता असून, त्यातून सुमारे १२ ते १३ टन मदतसामग्री पाठवली जाईल. यामध्ये पोर्टेबल जनरेटर सेटस्, डिग्निटी किटस्, अन्नपदार्थ, पाणी शुद्धीकरणाच्या गोळ्या आणि अत्यावश्यक औषधांचा समावेश असेल.
नेपाळ-तिबेट सीमेवर आणखी एक तलाव फुटल्यानंतर नेपाळमधील भोटेकोशी, त्रिशुली आणि नारायणी नदीच्या काठी वसलेली गावे रिकामी केली जात आहेत. नेपाळी सैन्याने लोकांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना नदीकाठ सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. चीनने तिबेटमध्ये लेव्हल ४ अलर्ट जारी केला आहे आणि पुन्हा पुराच्या धोक्यामुळे मदत आणि बचाव मोहीम काही काळ थांबवली. सुमारे तीन तासांनंतर मदत आणि बचाव कार्य पुन्हा सुरू करण्यात आले. शुक्रवारी तलावातील पाणी वाढून सुमारे २५ लाख घनमीटर झाले होते. तलावातील पाणी ओसंडून वाहू लागले आणि ल्हेंदे खोला व नंतर त्रिशुली नदीत पोहोचले. यानंतर नेपाळमधील बचाव पथकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले होते.
नेपाळ आणि तिबेटमध्ये पूर-भूस्खलनामुळे आतापर्यंत ५५२ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १५०० हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.
नेपाळमध्ये...
- ५४९ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. ९७७ जण अजूनही बेपत्ता आहेत.
- बेपत्ता लोकांमध्ये ५१७ परदेशी नागरिक, ४५ नेपाळी लष्कराचे जवान आणि ४१ नेपाळ पोलिस कर्मचारी समाविष्ट आहेत.
तिबेटमध्ये...
- तीनजणांच्या मृत्यूची पुष्टी झाली. ५५८ जण अजूनही बेपत्ता.
- बेपत्ता लोकांमध्ये २६० परदेशी नागरिक समाविष्ट आहेत.