NEET UG Re-Exam 2026 Pudhari
राष्ट्रीय

NEET UG Re-Exam 2026 : NTAला उपरती! अबुधाबी केंद्र मिळालेल्या विद्यार्थ्याला नागपुरातच मिळालं केंद्र

NEET UG Re-Exam 2026 : चूक व्हायरल होताच NTA कडून नवी दुरुस्ती

पुढारी वृत्तसेवा

NEET UG Re-Exam 2026 : 'नीट-युजी' फेर परीक्षा (NEET UG Re-Exam) रविवार, २१ जून रोजी होणार आहे. मात्र यापूर्वी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीचा (NTA) एक मोठा आणि धक्कादायक घोळ समोर आला होता. नागपूरमध्ये राहणाऱ्या अब्दुल्ला तालबिया या विद्यार्थ्याला चक्क थेट यूएईमधील (UAE) 'अबू धाबी' येथील परीक्षा केंद्र देण्यात आले होते. या प्रकारामुळे विद्यार्थ्याचा गोंधळ उडाला आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला. मात्र, हे वृत्त सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर व्हायरल होताच 'एनटीए'ने तातडीने पावले उचलत अब्दुल्लाला नागपुरातच नवीन केंद्र उपलब्ध करून दिले आहे.

एनटीएच्‍या कारभारावर चौफेर टीका, तातडीने कारवाई

हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मीडिया आणि सोशल मीडियावरून एनटीएच्या कारभारावर जोरदार टीका सुरू झाली होती. वाढता दबाव पाहता एनटीएने त्वरित आपली चूक सुधारली. एजन्सीने अब्दुल्लासाठी नागपूरमधील एका मेडिकल कॉलेजचे नवीन प्रवेशपत्र (Admit Card) जारी केले असून, त्याला नागपुरातीलच 'अजनी केंद्रीय विद्यालय' हे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलून मिळाल्याने विद्यार्थ्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी मोठा सुटकेचा श्वास सोडला आहे.

कुटुंबीयांनी मानले माध्यमांचे आभार

या संपूर्ण गोंधळानंतर अब्दुल्लाच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांचे विशेष आभार मानले आहेत. विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितले की, "परीक्षेच्या अवघ्या काही तास आधी आम्हाला नवीन ॲडमिट कार्ड मिळाले आहे. आता त्याला नागपूरच्या अजनी येथील केंद्रीय विद्यालयात केंद्र मिळाले आहे. एनटीएने घेतलेल्या या त्वरित निर्णयाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. तसेच माध्यमांचेही विशेष आभार, ज्यांनी ही चूक वेळेत समोर आणून प्रशासनावर दबाव निर्माण केला आणि आमच्या मुलाचे शैक्षणिक वर्ष वाचवले."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT