नीट परीक्षा ( NEET UG 2024) पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय अन्‍वेषण विभागाने ( सीबीआय) बुधवारी पाटणा एम्सच्या चार वैद्यकीय विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.  File Photo
राष्ट्रीय

'नीट' पेपरफुटी प्रकरणी पाटणा 'एम्स'चे चार विद्यार्थी 'सीबीआय'च्‍या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नीट परीक्षा ( NEET UG 2024) पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय अन्‍वेषण विभागाने ( सीबीआय) बुधवारी पाटणा एम्सच्या चार वैद्यकीय विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी तिघांना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते. सीबीआयच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आज एक विद्यार्थी स्वतःहून सीबीआयसमोर हजर झाला. सर्वांचे लॅपटॉप आणि मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. या पेपरफुटी प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचा आरोप होत आहे.

सीबीआयने ताब्‍यात घेतलेले तीन वैद्यकीय विद्यार्थी हे २०२१च्‍या नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत. वसतिगृहातील त्‍यांच्‍या खोलीही सील करण्यात आली आहे. या प्रकरणी माध्‍यमांशी बोलताना पाटणा एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. गोपाल कृष्ण पाल म्हणाले की, पाटणा एम्सच्या एकाही डॉक्टरला अटक करण्यात आलेली नाही. सीबीआयच्या पथकाने तीन विद्यार्थ्यांना स्वतःसोबत नेले आहे. यावेळी एक विद्यार्थी वसतिगृहात नव्हता. आज तो स्‍वत: सीबीआय कार्यालयात गेला.

आम्ही सीबीआयला सहकार्य करू

डॉ. गोपाल कृष्ण पाल यांनी सांगितले की, सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याआधी NEET UG प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व आरोपी विद्यार्थ्यांची नावे, त्यांची छायाचित्रे आणि मोबाइल क्रमांक शेअर केली होती. सीबीआयची टीम सतत आमच्या संपर्कात होती. आम्ही त्‍यांनी पूर्ण सहकार्य करत आहोत. या विद्यार्थ्यांच्या पेपरफुटीमध्‍ये सहभाग आहे की नाही, याबाबत आम्‍हाला माहिती नाही. सीबीआय तपासात सर्व काही स्पष्ट होईल. चंदन सिंग, राहुल आनंद, करण जैन आणि कुमार सानू अशी ताब्‍यात घेण्‍यात आलेल्‍या विद्यार्थ्यांची नावे आहेत. चंदन सिवान, कुमार सानू हे पटणा येथील राहुल धनबाद तर करण जैन हा अररियाचे रहिवासी आहे. सीबीआयने तीन विद्यार्थ्यांच्या खोल्या सील केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याची खोलीही सील केल्‍या असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

या प्रकरणी सीबीआयने सोमवार, १५ जुलै राजी पंकज कुमार याला पाटणा येथून अटक केली होती. त्याचा साथीदार राजू याला हजारीबाग येथून पकडण्यात आले. पंकज आणि राजू यांच्या चौकशीच्या आधारे सीबीआयला अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळणार आहेत. 'एनटीए'ची प्रश्नपत्रिका पंकज कुमारने चोरल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर हा पेपर पुढे पाठवण्यात आला. हा पेपर व्हायरल झाला होता. पंकज हा मूळचा बोकारोचा आहे. तर राजू सिंग हा पंकजचा मित्र आहे. नेट पेपरफुटी प्रकरणात त्याची महत्त्वाची भूमिका होती. सीबीआय या दोघांचा बराच काळ शोध घेत होती.

नीट परीक्षेच्‍या पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत सुमारे ५७ जणांना अटक केली असून ६ गुन्‍हे दाखल केले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 22 जणांना जामीन मिळाला आहे. सीबीआयने काही दिवसांपूर्वी राकेश उर्फ ​​रॉकीला अटक केली होती. आता सीबीआय पेपर लीक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संजीव मुखियाचा शोध घेत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT