नवी दिल्ली : राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) ने नीट-यूजी २०२५ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पॅटर्न आणि परीक्षेच्या कालावधीबाबत स्पष्टीकरण देत एक सूचना जारी केली आहे. एनटीएने म्हटले आहे की, प्रश्नपत्रिका पॅटर्न आणि परीक्षेचा कालावधी कोविड-पूर्व स्वरूपात असेल. कोविड-१९ साथीच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात आणण्यात आलेली पर्यायी प्रश्नांची तरतूद आता उपलब्ध राहणार नाही. कोविडमुळे परिक्षेसाठी अतिरिक्त वेळ देण्यात येत होता, ती देखील तरतूद काढून टाकण्यात आल्याचे एनटीएने सूचनेत स्पट केले आहे.
एकूण एमसीक्यू पद्धतीचे १८० अनिवार्य प्रश्न असतील
भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात प्रत्येकी ४५ प्रश्न
जीवशास्त्राचे ९० प्रश्न
परीक्षेचा एकूण कालावधी १८० मिनिटे (३ तास) असेल.
परीक्षेचा कालावधी ३ तास २० मिनिटांचा होता. परीक्षेत बहुपर्यायी स्वरूपाचे (एमसीक्यू) २०० प्रश्न असायचे, ज्यापैकी उमेदवारांना १८० प्रश्न सोडवणे गरजेचे होते.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) ठरवल्यानुसार, नीट युजी २०२५ ची परीक्षा पेन आणि पेपर पद्धतीने (ओएमआर आधारित) एकाच दिवस आणि एकाच शिफ्टमध्ये घेण्यात येईल, असे एनटीएने या अगोदरच जाहीर केले आहे. यासाठी एनटीएने अधिसूचना काढली होती. गेल्या वर्षी नीट परीक्षेत कथित पेपर फुटीमुळे देशभरात गोंधळ झाला होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, २०१९ पासून, एनटीए राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या वतीने या परीक्षेचे आयोजन करीत आहे. सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेतली जाते.