NEET UG
नीट यूजीसाठीचे समुपदेशन पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. File Photo
राष्ट्रीय

NEET UG समुपदेशन पुढे ढकलले

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

कथित पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (अंडर ग्रॅज्युएट) किंवा नीट यूजीसाठीची (NEET UG) समुपदेशन प्रक्रिया शनिवारी पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

समुपदेशनासाठी अद्याप नवीन तारीख केलेली नाही. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने शनिवारी होणारी NEET-UG चे समुपदेशन प्रक्रिया पुढे ढकलली आहे. दरम्यान, नीट पुनर्परीक्षेची आवश्यकता नाही, यामुळे होतकरु विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम होईल. असे सांगत केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयासमोर या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा पुरावा आढळला नसल्याचेही केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. हे प्रतिज्ञापत्र प्राथमिक असून सर्व आरोपांचे खंडन यामध्ये करण्यात आले नसल्याचेही केंद्र सरकारने सांगितले.

नीट परीक्षेत कथित पेपरफुटी झाल्याच्या आरोपावरुन देशभरात गोंधळ झाला. यानंतर संपूर्ण परीक्षा रद्द करुन पुनर्परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयातही करण्यात आली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापज्ञात सरकारने म्हटले आहे की, परीक्षा पूर्णपणे रद्द केल्याने नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो होतकरु विद्यार्थ्यांचा विश्वासघात होईल. नीट परीक्षेत तोतयागिरी, फसवणूक आणि गैरप्रकारांच्या कथित घटनांबाबत, सीबीआयला सर्वसमावेशक तपास करण्यास सांगितले असल्याचेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

याआधी शुक्रवारी, सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त NEET-UG 2024 परीक्षेसाठी समुपदेशन पुढे ढकलण्यास नकार दिला होता. ही खुली आणि बंद प्रक्रिया नाही असे सांगत न्यायालयाने कथित गैरप्रकारामुळे परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने एनटीए, केंद्र आणि इतरांना नोटीस बजावली होती.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ११ जून रोजी परीक्षा पुन्हा आयोजित करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना, नीट परिक्षेच्या पारदर्शकतेबद्दल चिंता व्यक्त केली होती. तेव्हा न्यायालयाने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय चाचणी संस्थेला या प्रकरणी उत्तर देण्यासही सांगितले होते. तर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ८  जुलै रोजी या प्रकरणीच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे.

SCROLL FOR NEXT