NEET UG 2026 Re-exam Date
नवी दिल्ली: ३ मे रोजी झालेल्या नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षेबाबतची प्रतीक्षा अखेर संपली असून, 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'ने नीट-युजी २०२६ च्या परीक्षेची तारीख अधिकृतपणे जाहीर केली आहे. ही परीक्षा येत्या २१ जून २०२६ रोजी घेतली जाणार असल्याचे एनटीएने आज (दि. १५) जाहीर केले आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एनटीएने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. भारत सरकारच्या मान्यतेनंतर, राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने २१ जून २०२६, रविवार रोजी नीट-युजी २०२६ च्या पुनर्परीक्षेचे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत वेबसाइट आणि माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीवरच अवलंबून राहावे, असे आवाहन एनटीएने यावेळी पालक आणि उमेदवारांना केले आहे.
काल रात्री उशिरा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक सलग सुमारे दोन तास चालली. या बैठकीदरम्यान पुनर्परीक्षा आणि भविष्यात प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी, शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, NTA चे महासंचालक अभिषेक सिंह, CBSE चे अध्यक्ष राहुल सिंह, तसेच केंद्रीय विद्यालय संगठन आणि नवोदय विद्यालय समिती यांचे आयुक्त यांसह विविध अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर, संस्थेने आता पुनर्परीक्षेची तारीख अधिकृतपणे जाहीर केली आहे.
'NEET UG' परीक्षा ३ मे रोजी झाली होती. ही परीक्षा एकाच सत्रात घेतली होती. या परीक्षेसाठी एकूण २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. या वादामुळे, भारतातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या या परीक्षेच्या विश्वासार्हतेबाबत आणि सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. आता, या पुनर्परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणतेही प्रवेशपत्र जारी केलेले नाही.
नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) ने जयपूर जिल्ह्यातील जामवा रामगढ शहरातून दोघा भावांना अटक केली. दिनेश बिवाल आणि मंगिलाल बिवाल अशी त्यांची नावे आहेत. दिनेश हा भाजपचा पदाधिकारी आहे. याच प्रकरणात राहुरीतून धनंजय निवृत्ती लोखंडे (वय 26) याला ताब्यात घेण्यात आले आहे. तो माहेगाव-महाडूक सेंटर परिसरातील रहिवासी असल्याचे समजते. तर, पुणे पोलिसांनी बिबवेवाडी परिसरातील सुखसागरनगर येथून मनीषा वाघमारे या ब्युटीपार्लर चालवणार्या महिलेला आणि मांजरी परिसरातून इंजिनिअरिंग करत असलेल्या शेषराव सोळंकी या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले आहे.
राजस्थान विशेष कृती गटा (एसओजी) च्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, दिनेश बिवाल आणि त्याचा भाऊ मंगिलाल बिवाल यांना हरियाणातील एका व्यक्तीकडून नीट-2026 परीक्षेचे 120 प्रश्न असलेला गेस पेपर मिळाला होता. त्यांनी तो 15 लाख रुपयांना विकत घेतला आणि नंतर सीकरमधील अनेक विद्यार्थ्यांना विकला. आम्ही त्याला सोमवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सीबीआयने बुधवारी सकाळी त्यांना अटक करून दिल्लीला नेले. दिनेशच्या मुलासह त्याच्या कुटुंबातील पाचजणांनी नीट परीक्षा ‘क्रॅक’ केल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे संशय बळावला.