NEET UG 2026 Paper Leak Case
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने १४ आरोपींविरोधात औपचारिक आरोप निश्चित केले आहेत. शनिवारी (२१ नोव्हेंबर) न्यायालयासमोर हजर करण्यात आलेल्या सर्व आरोपींनी आरोप मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे आता २५ नोव्हेंबरपासून या प्रकरणाच्या नियमित खटल्याला सुरुवात होणार आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेशी (एनटीए) संबंधित तीन विषयतज्ज्ञांसह प्रश्नपत्रिका बाहेर पोहोचविणारे कथित मध्यस्थ, शिकवणी चालक आणि आर्थिक व्यवहारात सहभागी व्यक्तींना आरोपी करण्यात आले आहे.
सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या गोपनीय प्रक्रियेत सहभागी असलेल्या तीन विषयतज्ज्ञांनी प्रश्न बाहेर काढले. यानंतर मध्यस्थांच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. या व्यवहारातून आर्थिक फायदा मिळविण्याचा कट रचल्याचा तपास यंत्रणेचा आरोप आहे. या प्रकरणात फसवणूक, गुन्हेगारी कट, विश्वासघात, पुरावे नष्ट करणे, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायदा आणि कॉपीराइट कायद्यांतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
एनटीएशी संबंधित मनीषा गुरुनाथ मांढरे (जीवशास्त्र), पी. व्ही. कुलकर्णी (रसायनशास्त्र) आणि मनीषा संजय हवालदार (भौतिकशास्त्र) या तीन विषयतज्ज्ञांवर गोपनीय प्रश्न बाहेर काढल्याचा आरोप आहे. कुलकर्णीने रसायनशास्त्राचे १३५ प्रश्न आणि पर्याय चिठ्ठ्यांवर लिहून बाहेर नेल्याचा सीबीआयचा दावा आहे. तर मांढरे यांनी एनसीईआरटीच्या पुस्तकांच्या आधारे प्रश्नांचे संबंधित धडे आणि परिच्छेद ओळखून विद्यार्थ्यांना प्रश्न समजावून सांगितल्याचा आरोप आहे. हवालदारने भौतिकशास्त्राचे प्रश्न बाहेर काढून ते पुढे पोहोचविण्यासाठी सहकाऱ्यांची मदत घेतल्याचे आरोपपत्रात नमूद आहे.
भौतिकशास्त्राचे प्रश्न हस्तलिखित स्वरूपात तयार करून ते हवालदारच्या पतीच्या मोबाईलवर पाठविण्यात तेजस हरशदकुमार शाह याने मदत केल्याचा आरोप आहे. लातूरमधील क्लासेसशी संबंधित शिवराज मोटेगावकरने सुमारे पाच लाख रुपयांच्या व्यवहारातून रसायनशास्त्राचे प्रश्न मिळवल्याचा आरोप आहे. त्याच्या मोबाईलमधून १३६ हस्तलिखित प्रश्न मिळाले असून त्यापैकी १११ प्रश्न एनटीएच्या प्रश्नसंचाशी जुळल्याचे सीबीआयने म्हटले आहे.लातूरमधील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनोज शिरुरे याने विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न पोहोचविण्यासाठी हॉस्पिटलचा वापर होऊ दिल्याचा आणि मोटेगावकर व कुलकर्णी यांच्यात मध्यस्थी केल्याचा आरोप आहे. मनीषा वाघमारे हिने विद्यार्थ्यांची व्यवस्था करून प्रश्नांच्या नोट्स आणि गोपनीय माहिती एकत्रित केल्याचा आरोप आहे. धनंजय लोखंडे याने वाघमारेकडून प्रश्न मिळवून ते पुढे विकण्याचा व्यवहार केल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. शुभम मधुकर खैरनार याने हे प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रती आणि नोट्स तयार केल्याचा आरोप आहे.
यश यादव याने शुभम खैरनारकडून प्रश्न मिळवून ते हरियाणा आणि इतर राज्यांतील संपर्कांपर्यंत पोहोचवल्याचा आरोप आहे. मांगीलाल बिवाल याने मुलासाठी प्रश्न मिळविण्याचा व्यवहार केल्याचा, तर दिनेश बिवाल आणि विकास बिवाल यांनी प्रश्नांच्या प्रती तयार करणे आणि त्यांचे वितरण करणे यात सहभाग घेतल्याचा आरोप आहे. पुण्यात कोचिंग क्लासबाहेर चहाचा स्टॉल चालविणाऱ्या शेषराव सूर्यवंशीने दोन विद्यार्थ्यांना साडेचार लाख रुपयांत प्रश्नपत्रिका मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. त्याच्यामार्फत आठ अन्य विद्यार्थ्यांपर्यंतही प्रश्न पोहोचल्याचे सीबीआयने आरोपपत्रात नमूद केले आहे.
सीबीआयने या प्रकरणात ३६० साक्षीदार, ४२२ कागदपत्रे आणि ४३ वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे आरोप सिद्ध करण्याची तयारी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा एनटीएच्या पदाधिकाऱ्याला आरोपी करण्यात आलेले नाही. सर्व आरोपींवरील आरोप न्यायालयीन खटल्यात सिद्ध होणे बाकी आहे.
मनीषा मांढरे : जीवशास्त्राचे गोपनीय प्रश्न मिळवून एनसीईआरटीच्या आधारे संबंधित धडे व परिच्छेद ओळखणे आणि विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न पोहोचविणे
पी. व्ही. कुलकर्णी : रसायनशास्त्राचे १३५ प्रश्न व पर्याय चिठ्ठ्यांवर लिहून गोपनीय विभागातून बाहेर नेणे.
मनीषा हवालदार : भौतिकशास्त्राचे प्रश्न बाहेर काढून हस्तलिखित स्वरूपात पुढे पाठविणे.
तेजस शाह : भौतिकशास्त्राचे प्रश्न लिहून ते हवालदार यांच्या पतीच्या मोबाईलवर पाठविणे.
शिवराज मोटेगावकर : सुमारे पाच लाख रुपयांच्या व्यवहारातून रसायनशास्त्राचे प्रश्न मिळविणे.
डॉ. मनोज शिरुरे : हॉस्पिटलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न पोहोचविणे आणि कथित आर्थिक व्यवहारात मध्यस्थी करणे.
मनीषा वाघमारे : विद्यार्थ्यांची व्यवस्था करणे, गोपनीय प्रश्नांच्या नोट्स एकत्र करणे आणि पुढे पोहोचविणे.
धनंजय लोखंडे : वाघमारेकडून प्रश्न मिळवून ते शुभम खैरनारला विकण्याचा व्यवहार करणे.
शुभम खैरनार : प्रश्नांच्या प्रती व नोट्स तयार करून विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न पोहोचविणे.
यश यादव : प्रश्न मिळवून हरियाणा आणि अन्य राज्यांतील संपर्कांपर्यंत पोहोचविणे.
मांगीलाल बिवाल : मुलासाठी गोपनीय प्रश्न मिळविण्याचा आर्थिक व्यवहार करणे.
दिनेश बिवाल : प्रश्नांच्या प्रती तयार करणे आणि वितरणाच्या कथित प्रक्रियेत सहभागी होणे.
विकास बिवाल : प्रश्नपत्रिकेतील गोपनीय माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या कथित व्यवहारात सहभाग.
शेषराव सूर्यवंशी : पुण्यातील विद्यार्थ्यांना साडेचार लाख रुपयांत प्रश्नपत्रिका मिळवून देण्याचे आश्वासन देणे, आठ विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न पोहोचविणे.