नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मंगळवारी आणखी काही आरोपींना राऊस अॅव्हेन्यू येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले. या प्रकरणातील आरोपी डॉ. मनोज शिरुरे, प्रल्हाद कुलकर्णी, शिवराज मोटेगावकर आणि तेजस शाह यांना न्यायालयासमोर सादर करण्यात आले. यापैकी डॉ. मनोज शिरुरे आणि तेजस शाहला १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. सीबीआयने दोन्ही आरोपींसाठी पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. तर प्रल्हाद कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकरला १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
सुनावणीदरम्यान सीबीआयने न्यायालयात सांगितले की, पुण्यातील डॉ. प्रभू मेडिकल अकादमी येथे भौतिकशास्त्र विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत असलेला आरोपी तेजस शाह याने आरोपी मनीषा हवालदार हिच्याकडून नीट परीक्षेतील लीक झालेले भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्न प्राप्त केले होते. या संपूर्ण रॅकेटमागील कट आणि नेटवर्कचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचे सीबीआयने न्यायालयाला सांगितले.
सीबीआयकडून देशभरात आतापर्यंत ४९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून, त्यामध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची सविस्तर तपासणी सुरू असल्याची माहितीही न्यायालयात देण्यात आली. दरम्यान, सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांकडून विविध मुद्द्यांवर युक्तिवाद करण्यात आला.