नवी दिल्ली : नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून, एनएसयूआयने शनिवारी 'राष्ट्रीय चाचणी संस्था' (एनटीए) च्या मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी त्यांनी एनटीए तातडीने बरखास्त करण्याची आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली.
'नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया' चे सदस्य या आंदोलनात सहभागी झाले होते. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड यांच्या नेतृत्वाखाली, " एनटीए हल्ला बोल" या फलकाखाली हे आंदोलन पार पडले.
परीक्षेशी संबंधित तणावामुळे तीन विद्यार्थ्यांनी कथितरित्या आत्महत्या केल्याचा आरोप संघटनेने केला असून, या परिस्थितीसाठी त्यांनी परीक्षा आयोजन करणारी संस्था आणि केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे.
एनएसयूआयच्या मागण्या
• एनटीए तात्काळ बरखास्त करण्यात यावी.
• शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.
• पेपरफुटी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी करावी
• विद्यार्थ्यांना मोफत मानसिक आरोग्य सहाय्य पुरवण्यात यावे.
• विद्यार्थ्यांना मोफत कायदेशीर मदत पुरवण्यात यावी.
• आर्थिक नुकसानभरपाई आणि सहाय्य पुरवण्यात यावे.