उमेश कुमार
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाची मंगळवारी (दि. 9) निवडणूक जरी केवळ एक औपचारिकता वाटत असली तरी त्यामागे दडलेले राजकीय पैलू अधिक रंजक आहेत. एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. संसदीय आकडेवारी स्पष्टपणे सांगते की, एनडीएकडे इतके मजबूत संख्याबळ आहे की, ते आरामात बहुमताचा आकडा पार करतील. एकूण 782 खासदार या निवडणुकीत मतदान करतील आणि साध्या बहुमतासाठी 392 मतांची गरज आहे. एकट्या भाजपचे लोकसभा आणि राज्यसभा मिळून 340 पेक्षा जास्त खासदार आहेत. यात एनडीएच्या सहकारी पक्षांची भर पडल्यास हा आकडा 426 च्या आसपास पोहोचतो. त्यामुळे राधाकृष्णन यांचा विजय जवळपास आधीच निश्चित आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
मग प्रश्न असा आहे की, जेव्हा निकाल निश्चित आहे, तेव्हा विरोधक पूर्ण ताकदीने मैदानात का उतरले आहेत? ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव निश्चित मानला जात असला तरी विरोधकांना ही लढाई केवळ ‘हार-जीत’पुरती मर्यादित ठेवायची नाही. आपली व्होट बँक वाढवणे, ही विरोधकांची रणनीती आहे. त्यासाठी त्यांचे सर्वात मोठे शस्त्र आहे ‘क्रॉस व्होटिंग’. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत गुप्त मतदानाने मतदान होते आणि पक्षाचा व्हिप लागू होत नाही. हीच ती जागा आहे जिथे विरोधकांना आशा आहे की एनडीएच्या आतून काही असंतोष उफाळून येईल.
आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, लोकसभेत भाजपचे 240 खासदार आहेत. एनडीएच्या इतर मित्रपक्षांसह हा आकडा 292 पर्यंत पोहोचतो. राज्यसभेत भाजपचे सुमारे 102 खासदार आहेत आणि मित्रपक्षांसह एनडीएचा आकडा 134 च्या जवळपास आहे. अशा प्रकारे एनडीए एकूण सुमारे 426 मतांसह निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे 99, तृणमूल काँग्रेसचे 29, डीएमकेचे 22 आणि इतर प्रादेशिक तसेच विरोधी आघाडीतील राज्यसभेच्या सदस्यांची भर घातल्यास ‘इंडिया’ आघाडीची ताकद सुमारे 345-356 च्या दरम्यान आहे.
याचा अर्थ स्पष्ट आहे की, विरोधक संख्याबळात मागे आहेत. परंतु त्यांचे लक्ष आकडेवारी बदलण्यावर नसून राजकीय संदेश देण्यावर आहे. जर विरोधकांनी आपल्या उमेदवाराच्या बाजूने काही अतिरिक्त मते मिळवली, तर संपूर्ण देशात भाजप आणि एनडीएमध्ये सर्व काही ठीक नाही असाच संदेश जाईल. हीच विरोधकांची रणनीती आहे - पराभवालाही विजयाचे स्वरूप देणे.
या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिकाही कमी महत्त्वाची नाही. आंध्र प्रदेशमधील वायएसआर काँग्रेस, तेलुगू देसम पार्टी, तेलंगणातील बीआरएस, उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टी किंवा महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट (एनसीपी गट) यापैकी कोणताही पक्ष क्रॉस व्होटिंग करेल, तर विरोधी पक्ष याचा फायदा आपल्या बाजूने वातावरण तयार करण्यासाठी करेल. म्हणूनच ‘इंडिया’ आघाडी या पक्षांच्या खासदारांवर विशेष लक्ष देत आहे.
राजकीयदृष्ट्या ही निवडणूक भाजपसाठी आपली ताकद दाखवण्याची संधी आहे, तर विरोधकांसाठी आपली उपस्थिती नोंदवण्याची. एनडीएचा विजय जवळपास निश्चित असला तरी, खरी लढाई ही आहे की पराभवानंतरही विरोधक किती मते मिळवू शकतात. जर विरोधकांनी अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळवली, तर मोदी सरकारमध्येही मतभेद आहेत असा संदेश जाईल. तर मतांमधील फरक खूप जास्त राहिल्यास विरोधकांची कमकुवतपणा आणि दुफळी उघड होईल.
अशा प्रकारे उपराष्ट्रपती निवडणूक 2025 चा निकाल आधीच लिहून ठेवल्यासारखा वाटत असला तरी, त्यात दडलेला राजकीय संदेश येणार्या दिवसांच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. एनडीएचा विजय निश्चित आहे. पण विरोधकांचा खरा विजय यामध्ये असेल की ते आपला पराभव किती कमी करू शकतात आणि त्याचे राजकीय भांडवलात किती रूपांतर करतात.