राष्ट्रीय

NCERT 9th Book : ‘एनसीईआरटी’ने नववीच्या पुस्तकातून संविधानाची प्रस्तावना काढून टाकली, समाजवादी-धर्मनिरपेक्ष या शब्दांनाही बगल

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : नववीच्या समाजशास्त्र पुस्तकातून ‘एनसीईआरटी’ने संविधानाची प्रस्तावना काढून टाकली असून, सोशालिस्ट (समाजवादी) आणि सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) या शब्दांचाही उल्लेख गाळला आहे. सोबतच या पुस्तकात आणीबाणीवर एक वेगळा विभाग जोडला आहे.

पुस्तकातील ‘अंडरस्टँडिंग सोसायटी : इंडिया अँड बियॉन्ड’ या प्रकरणात आणीबाणीला लोकशाहीसमोर आलेल्या सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक म्हटले आहे. तथापि, यात संविधानाची चर्चा त्याची निर्मिती, लोकशाही संस्था आणि मूलभूत अधिकारांच्या माध्यमातून केली आहे, मात्र, सार्वभौम, ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’, ‘लोकशाही’ आणि ‘प्रजासत्ताक’ यांसारख्या शब्दांबद्दल माहिती दिलेली नाही.

या पुस्तकात लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेचेही सविस्तर वर्णन केले आहे. यात म्हटले आहे की, त्यांनी विद्यार्थी आणि सामान्य लोकांना संघटित केले आणि बिहार तसेच गुजरातमध्ये मोठी जनआंदोलने उभी राहिली.

पुस्तकानुसार, १९७७ मध्ये आणीबाणी संपल्यानंतर सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. जनतेने मतदानाच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले आणि सत्ताधारी पक्ष पराभूत झाला. पुस्तकात याचा उल्लेख भारतीय लोकशाहीचे बळकटीकरण असा केला आहे. इंदिरा गांधी यांच्याविरोधात वाढलेली तीव्र नाराजी आणि आणीबाणीच्या काळातील घटना, राजकीय नेत्यांना विनाचौकशी झालेली अटक आदी घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

लोकशाहीसमोरील आव्हानेही समाविष्ट

आणीबाणीव्यतिरिक्त पुस्तकात लोकशाहीसमोरील इतर आव्हानांवरही चर्चा केली आहे. यामध्ये फेक न्यूज, चुकीची माहिती, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, नियमांचे उल्लंघन, गरिबी, प्रादेशिकता, सामाजिक भेदभाव आणि लैंगिक असमानता यांचा समावेश आहे. तसेच एनसीईआरटीने प्रथमच ‘डेमोक्रेसी अँड यू’ नावाचा नवीन विभाग जोडला आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेतील त्यांची भूमिका समजावून सांगणे हा आहे.

पुस्तकात निवडणूक आयोगाचे कौतुक

या पुस्तकात देशाच्या निवडणूक आयोगाचे देखील कौतुक केले आहे. भारतात निवडणुका घेणे हे जगातील सर्वात मोठ्या कामांपैकी एक आहे. तरीही निवडणूक आयोग निष्पक्ष निवडणुका घेण्याचा प्रयत्न करतो. तथापि निवडणूक आयोगाचे प्रयत्न पुरेसे नाहीत. निष्पक्ष निवडणुकांसाठी लोकांची जागरूकता आणि सहभागही आवश्यक आहे. नागरिक जितके सतर्क राहतील, लोकशाही तितकी मजबूत होईल, असे पुस्तकात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT