Gujarat Police She Team :
नवरात्रीत गरब्यावर थिरकण्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी तुफान गर्दी असते. गुजरातमध्ये गरबा खेळण्यासाठी लहान मुलांपासून वयोवृद्ध सर्वच जण उत्सुक असतात. मात्र गरब्याच्या ठिकाणी अनेकवेळा अनुचित प्रकार देखील घडतात. विशेष करून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम भेडसावत असतो. गरबा खेळताना महिलांशी कोणी गैर वर्तन करू नये म्हणून गुजरात पोलिसांनी एक मोहीम राबवली आहे.
या मोहिमेला She Team असं नाव देण्यात आलं आहे. जेव्हापासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे तेव्हापासून गुजरातमधील अनेक पोलीस स्टेशनमधील संध्याकाळचं वातावरण हे गरबामय झालं आहे. अनेक महिला कॉन्स्टेबल या गरब्याच्या पेहराव्यात पोलीस स्टेशनमध्ये येत आहेत. त्यांच्यावर या सणाच्या काळात एक महत्वाची जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी नवरात्रीसाठीचे पारंपरिक कपडे परिधान करून आपली ड्युटी करायची आहे. त्या आता गरबा मंडळांमध्ये अंडर कव्हर महिला पोलीस म्हणून कार्यरत असतील.
नवरात्रीमध्ये गुजरात पोलीसांची ही अंडर कव्हर She Team सामन्य नागरिकांमध्ये मिसळून गरबा खेळेल. मात्र ते करत असताना या पोलीस कॉन्स्टेबल सर्वांवर करडी नजर देखील ठेवतील. जर कोणी गैरवर्तन करू लागलं तर, महिलाचा छळ करू लागलं तसंच चोरी, दारू पिऊन दंगा करू लागलं तर या अंडर कव्हर महिला पोलीस लगेच कार्यरत होतील अन् त्यांना पोलिसी खाक्या दाखवतील.
नवरात्रीच्या काळात गुजरात पोलिसांनी ५७४ She Team कार्यरत असतील. यात ५२३ महिला अधिकारी गरबा आयोजित करण्यात आलेल्या जवळपास १ हजार ३११ ठिकाणी तैनात असतील. त्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतील.
महिला कॉन्स्टेबलसाठी ही नवी ड्युटी आव्हानात्मक आहे. कारण त्या संपूर्ण दिवस आपली सामान्य ड्युटी करून रात्री या विशेष अंडर कव्हर मोहिमेत सामील होतील. त्या आपला युनिफॉर्म चेंज करून चुनरी चोलीचा पारंपरिक वेश परिधान करतील. या ड्युटीमुळं त्यांना ऐन सणासुदीच्या काळात त्यांची ड्युटी आणि कुटुंब या दोन्हीचा समतोल साधावा लागत आहेत.