Women Safety In India Pudhari
राष्ट्रीय

NARI 2025 Report: महिलांसाठी देशात मुंबई सर्वाधिक सुरक्षित; अन्य शहरी भागांबाबात धक्कादायक आकडेवारी समोर

National Annual Report & Index on Women's Safety: ३१ शहरांमधील १२,७७० महिलांचे सर्वेक्षण

पुढारी वृत्तसेवा

NARI 2025 report Safest City In India For Women

देशात दररोज महिलांवरील हिंसाचार, गुन्हे आणि हत्येच्या बातम्या समोर येतात. दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नुकताच महिला सुरक्षेवरील राष्ट्रीय वार्षिक अहवाल (NARI) जाहीर केला आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, देशाच्या शहरी भागातील ४० टक्के महिलांना असुरक्षितेता वाटते. या अहवालासाठी ३१ शहरांमधील १२,७७० महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले.

गेल्या काही दिवसांत अशा अनेक हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे पालकांची चिंता आणखी वाढली आहे. कोणत्याही देशात महिलांची सुरक्षितता हा एक मोठा मुद्दा आहे. जेव्हा जेव्हा एखादी महिला घराबाहेर पडते तेव्हा तिच्या सुरक्षिततेचा विचार नक्कीच येतो. विशेषतः जेव्हा एखादी मुलगी नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जाते तेव्हा कुटुंब नेहमीच तिच्या सुरक्षिततेबद्दल चिंतेत असते. रस्ता असो, बस असो, मेट्रो असो किंवा बाजारपेठ असो, या ठिकाणी महिलांना अनेकदा विविध त्रासदायक घटनांना सामोरे जावे लागते. काही जणी अशा छळाविरुद्ध निषेधही करतात, पण अनेक महिला-मुली हा छळ निमुटपणे सहन करून गप्प राहतात.

NARI २०२५ च्या अहवालानुसार, २०२४ मध्ये ७ टक्के महिलांनी सांगितले की त्यांचा छळ झाला. त्याच वेळी, १८ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणींनी आपण असुरक्षित असल्याचे व्यक्त केले. ही आकडेवारी राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) च्या २०२२ च्या ताज्या आकडेवारीनुसार, महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या नोंद झालेल्या संख्येच्या १०० पट जास्त आहे.

अहवालात भारतीय शहरांमधील महिलांच्या सुरक्षेचे चिंताजनक वास्तव उघडकीस आले आहे. या अहवालासाठी ३१ शहरांमधील १२,७७० महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. देशाचा एकूण सुरक्षा निर्देशांक ६५ टक्के इतका नोंदला गेला असून, शहरांचे मूल्यमापन ‘अत्यंत चांगले’, ‘चांगले’, ‘कमी’, ‘अत्यंत कमी’ अशा श्रेणींमध्ये करण्यात आले.

कोणती शहरे सर्वाधिक सुरक्षित आणि असुरक्षित?

सर्वेक्षणानुसार, मुंबई, कोहिमा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, ऐझॉल, गंगटोक आणि इटानगर ही शहरे महिलांसाठी सर्वात सुरक्षित ठरली आहेत.

याउलट, पाटणा, जयपूर, फरिदाबाद, दिल्ली, कोलकाता, श्रीनगर आणि रांची ही शहरे सर्वात कमी सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे.

दिल्ली आणि फरीदाबाद हे पहिल्या पाच असुरक्षित शहरांमध्ये आहेत, जिथे जवळजवळ ४२% महिलांनी असुरक्षित असल्याचे मत नोंदवले. रांचीमध्ये हा आकडा आणखी जास्त आहे तिथे ४४% महिलांनी असुरक्षित असल्याचे सांगितले.

इशान्य भारतातील कोहिमा शहरात ८०% पेक्षा जास्त महिलांनी सुरक्षितेची भावना बोलून दाखवली. या शहरने देशातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणून अव्वल स्थान मिळवले आहे. तर विशाखापट्टणम, भुवनेश्वर, ऐझॉल, गंगटोक, इटानगर आणि मुंबई येथे जवळजवळ ७०% महिलांनी सुरक्षित असल्याचा अनुभव व्यक्त केला.

आकडेवारीतील वास्तव

एकूण १० पैकी ६ महिलांनी आपल्या शहरात सुरक्षित वाटत असल्याचे सांगितले, तर ४० टक्के महिलांनी स्वतःला 'असुरक्षित' मानले आहे.

दिवसा सुरक्षिततेची भावना जास्त असल्याचे आढळले. ८६ टक्के महिलांनी दिवसा शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुरक्षित वाटत असल्याचे सांगितले. मात्र, रात्रीच्या वेळी, विशेषतः सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर, सार्वजनिक वाहतुकीत आणि मनोरंजनाच्या ठिकाणी सुरक्षिततेची भावना मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे समोर आले आहे.

कामाच्या ठिकाणी ९१ टक्के महिलांनी सुरक्षित वाटत असल्याचे सांगितले. मात्र, जवळपास निम्म्या महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी 'लैंगिक छळ प्रतिबंधक' (POSH) धोरण आहे की नाही, याची खात्री नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT