Gaza Peace Donald Trump Efforts :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीत शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या पुढाकाराला हमासनं देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हमासनं ट्रम्प यांच्या २० पॉईंट पीस प्लॅन मान्य केला आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या प्रयत्नांचं तोंड भरून कौतुक केलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विटवर पोस्ट केली. ते लिहितात, 'डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली गाझामध्ये शांती प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचं आम्ही स्वागत करतो. इस्त्रायलचे बंधक सोडून देण्याचा निर्णय हा शांती प्रयत्न एका सकारात्मक दिशेनं वाटचाल करत आहेत याचे संकेत देतो. शांततेसाठी जे काही प्रयत्न केले जात आहेत त्याला भारताचा भक्कम पाठिंबा आहे.'
गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या गाझा पीस प्लॅनला पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांनी हा प्लॅन पॅलेस्टीन आणि इस्त्रायल यांच्यात दीर्घकालीन अन् शाश्वस शांती प्रस्थापित करण्यासाठीचा योग्य मार्ग आहे असं सांगितलं होतं
त्यांनी ट्विट केलं होतं की, 'आम्ही गाझा संघर्षावर ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या प्लॅनचं स्वागत करतो. हा या समस्येवरचा, पॅलस्टीन आणि इस्त्रायलमधील लोकांसाठीचा दीर्घकालीन उपाय आहे. तसंच हा प्लॅन पश्चिम आशियातील एका मोठ्या भागासाठी देखील महत्वाचा आहे. मला आशा आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या या पुढाकाराला संबंधित सर्व लोकं पाठिंबा देतील. हा प्रयत्न संघर्ष थांबवून शांतता प्रस्थापित करेल.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ट्विटला डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, शुक्रवारी रात्री हमासनं डोनाल्ड ट्रम्प यांचा शांती प्रस्ताव स्विकारला. त्यांनी इस्त्रायली बंधक सोडून देण्याचा निर्णय घेतला. यानंतर ट्रम्प यांनी इस्त्रायलला गाझावरील बॉम्ब वर्षाव त्वरित थांबवा असं सांगितलं.
ट्रुथ सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट लिहिली की, 'इस्त्रायलनं त्वरित गाझावरील बॉम्ब वर्षाव थांबवावा जेणेकरून आपल्याला बंधक सुरक्षित आणि त्वरित परत मिळतील. सध्या गाझावर हल्ला करणं खूप धोकादायक आहे. आम्ही याबाबत कसं पुढ जायचं याबाबत चर्चा केली आहे. हा फक्त गाझाचा प्रश्न नाहीये. तर संपूर्ण मध्य पूर्व आशियातील शांतीचा प्रश्न आहे.'
याचबरोबर ट्रम्प यांनी व्हिडिओ संदेशाग्वारे ज्या देशांनी मध्य पूर्व आशियात शांती प्रस्थापित करण्यासाठी मदत केली त्यांचे देखील आभार मानले.