पुढारी ऑनलाईन डेस्क : Narendra Modi BJP meeting | भाजपला लवकरच नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. २० एप्रिल नंतर अध्यक्ष निवडीची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि इतर काही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली जाणार आहे. बुधवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत, अध्यक्षपदाच्या निवडीसह राज्य पातळीवरील संघटनात्मक फेरबदलांवरही सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत भाजपचे अनेक वरिष्ठ नेते सहभागी झाले होते.
पंतप्रधान निवासस्थानी पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव बी.एल. संतोष यांचा सहभाग होता. या बैठकीत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या आगामी निवडणुकीसंबंधी सविस्तर चर्चा झाली असून, याची अधिकृत घोषणा येत्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत काही प्रमुख राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली. कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या राज्यांत नवीन प्रदेशाध्यक्षांची नावं जवळपास निश्चित झाली असून, सहा राज्यांचे नवे प्रदेशाध्यक्ष जाहीर केले जाणार आहेत.
या संघटनात्मक बदलांचा प्रभाव भाजपच्या आगामी निवडणुकीतील रणनीतीवर होईल, असे सांगितले जाते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठीची प्रक्रिया २० एप्रिलनंतर कोणत्याही वेळी सुरू होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक जानेवारीमध्ये होण्याचे नियोजन होते. जे.पी. नड्डा यांनी जानेवारी २०२० मध्ये अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आला होता. त्यानंतर हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्लीसारख्या राज्यांतील निवडणुकांमुळे तो पुन्हा वाढवला.
भाजपचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बुधवारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्याआधी मंगळवारी त्यांनी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांसोबत विचारविनिमय केला होता. बैठकीचे अजेंडा जरी औपचारिकरीत्या उघड करण्यात आलेला नसला, तरी पक्षातील सत्तास्थितीबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहेत. मंगळवारी रात्री नड्डा यांच्या निवासस्थानी अमित शाह, राजनाथ सिंह, पीयूष गोयल आणि इतर काही केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली होती.