पंतप्रधान मोदींकडून तरूणांना दिवाळी भेट; ५१ हजार नियुक्तीपत्रांचे वाटप  
राष्ट्रीय

पंतप्रधान मोदींकडून तरूणांना दिवाळी भेट; ५१ हजार नियुक्तीपत्रांचे वाटप

पंतप्रधान मोदी म्हणाले, यंदाची दिवाळी खूप खास

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळ्याअंतर्गत ५१ हजारहून अधिक नियुक्ती पत्रांचे वाटप केले. यंदाची दिवाळी खूप खास असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी सर्वंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

रोजगार मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील तरुणांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. सरकारी धोरणे आणि निर्णयांचाही थेट परिणाम रोजगार निर्मितीवर होतो. देशातील लाखो तरुणांना भारत सरकारमध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या देण्याची प्रक्रिया सुरू आहे. भाजप आणि एनडीए शासित राज्यांमध्येही लाखो तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. हरियाणात नवे सरकार स्थापन होताच २६ हजार तरुणांना नोकऱ्यांची भेट मिळाली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

आज देशाच्या कानाकोपऱ्यात द्रुतगती मार्ग, महामार्ग, रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, फायबर लाईन टाकण्याचे आणि नवीन उद्योगांच्या विस्ताराचे काम सुरू आहे. आपल्या लखपती दीदी योजनेने ग्रामीण महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची नवीन साधने दिली आहेत. गेल्या दशकात १० कोटी महिला बचत गटांमध्ये सामील झाल्या आहेत. १० कोटी महिलांनी स्वयंरोजगारातून कमाई सुरू केली आहे आणि सरकारने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. या महिलांमधून ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "खादीच्या विक्रीत यूपीए सरकारच्या तुलनेत ४०० टक्के वाढ झाली आहे. खादी उद्योग वाढत आहे, याचा फायदा कारागीर, विणकर आणि व्यापाऱ्यांना होत आहे. जगात नवनवीन तंत्रज्ञान यायचे, पण भारतात ते कधी येणार असा विचार करून आपण त्याची वाट पहायचो. आपल्या देशात आधुनिक तंत्रज्ञान विकसित होऊ शकत नाही, ही मानसिकता निर्माण झाली होती. भारत आधुनिक विकासाच्या शर्यतीत मागे पडला होता. रोजगाराचे महत्त्वाचे स्रोतही आपल्यापासून दूर जाऊ लागले होते. जे उद्योगधंदे रोजगार निर्माण करणार आहेत, तेच नसतील तर रोजगार कसा उपलब्ध होणार? अंतराळ क्षेत्रापासून ते सेमी-कंडक्टरपर्यंत, इलेक्ट्रॉनिक्सपासून इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत, आम्ही प्रत्येक नवीन तंत्रज्ञानामध्ये प्रगती केली आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी सरकारच्या विविध यशस्वी योजनांची माहिती तरूणांना दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT