नंदिनी दूध दरात आजपासून वाढ झाली.  Pudhari News Network
राष्ट्रीय

नंदिनी दूध दरात आजपासून वाढ

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : पेट्रोल, डिझेल दरात वाढ झाल्यानंतर आता दूध दरात वाढ करण्यात आली आहे. कर्नाटक मिल्क फेडरेशनने (केएमएफ) नंदिनी दूध दरात प्रति लिटर दोन रुपये वाढ केली असून बुधवारपासून (26 जून) नवे दर लागू होणार आहेत.

केएमएफचे अध्यक्ष भीमानायक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नंदिनी दुधाच्या एका लिटरच्या पाकिटामध्ये 50 मि.लि. जादा असणार आहे. ग्राहकांना दोन रुपये वाढीव रक्कम द्यावी लागली तरी त्या बदल्यात त्यांना 1 लिटर 50 मि.लि. दूध त्यांना मिळणार आहे. अर्धा लिटर आणि एक लिटर अशा दोन प्रकारांत नंदिनी दूध उपलब्ध असणार आहे. या दोन्ही पाकिटांमध्ये 50 मिली जादा दूध असेल. केवळ वाढीव दुधासाठी 2 रुपये आकारले जाणार आहेत. दुधाच्या दरात कोणतीही वाढ केली नाही, असा दावाही भीमानायक यांनी केला.

सध्या निळ्या रंगाच्या पाकिटातील दुधाचा दर 42 रुपये प्रति लिटर आहे. बुधवारपासून त्याचा दर 44 रुपये होणार आहे. अर्ध्या लिटर दुधासाठी 24 रुपये आकारले जातील. आता या दोन्ही पाकिटांमध्ये 50 मि. लि. अधिक दूध असणार आहे. दही व इतर उत्पादनांच्या दरामध्ये कोणतेही बदल केले नाहीत. सध्या दुग्धोत्पादन वाढले आहे. राज्यातील बहुतेक ठिकाणी दुधाचे संकलन वाढले आहे. सध्या रोज 1 कोटी लिटरपर्यंत दूध संकलन होत आहे. त्यामुळेच नियमित दुधाच्या पाकिटामध्ये जादा दूध दिले जाणार आहे.

स्टॉक असेपर्यंत जुन्या पाकिटांतूनच

सध्या केएमएफकडे मुद्रित असणारी जुनी पाकिटे आहेत. त्यामध्ये जादा दूध भरले जाणार असून दर दोन रुपये वाढीव असेल. पाकिटावर जुना दर मुद्रित असला तरी ग्राहकांनी सहकार्य करावे. मुद्रित पाकिटांचा साठा संपेपर्यंत त्या पाकिटांमधूनच दुधाची विक्री केली जाणार असल्याचे केएमएफचे अध्यक्ष भीमा नायक यांनी कळवले आहे.

भाजपचा विरोध

प्रदेश भाजपने दूध दरवाढीला विरोध केला आहे. तात्काळ दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा राज्यभर आंदोलन करू, असा इशारा भाजपने दिला आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनीही काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर दोनवेळा दूध दरवाढ झाल्याचा आरोप केला आहे. याआधी प्रति लिटर 3 रुपये आणि आता 2 रुपये वाढ करण्यात आली आहे. यामुळे गरीब, मध्यमवर्गीयांना आणखी अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे त्यांनी सोशल मीडियामार्फत कळवले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT