Nandini milk: नंदिनी दुधासह उपपदार्थ स्वस्त? Pudhari Photo
राष्ट्रीय

Nandini milk: नंदिनी दुधासह उपपदार्थ स्वस्त?

‘केएमएफ’कडून लवकरच निर्णय : जीएसटी घटल्याने दरकपात शक्य

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दरात घट केल्याने ‘केएमएफ’चा ब्रँड असलेल्या नंदिनी दुग्धोत्पादनांचे दर सोमवारपासून (दि. 22) कमी होण्याची शक्यता आहे. नंदिनी दुधासह अन्य उपपदार्थांचे दर कमी करण्याबाबत सरकार ‘केएमएफ’च्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत लवकरच बैठक घेणार असून, त्यानंतर दरकपातीचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

खाद्य उत्पादनांवरील जीएसटी 12 वरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे दही, तूप, लोणी, लस्सीसह विविध नंदिनी उत्पादनांच्या किमती कमी होतील, असे सांगितले जात आहे. लोणी, तूप आणि चीजवर पूर्वी 12 टक्के जीएसटी आकारला जात होता. हा कर 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्यामुळे या उत्पादनांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. तर पनीर आणि दुधावर पूर्वी 5 टक्के कर आकारला जात होता. आता या उत्पादनांवर शून्य कर आकारला जाणार आहे. त्यामुळे याच्याही किमती कमी होणार आहेत. दह्याचे दर प्रतिलिटर 4 रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. अधिकार्‍यांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार आहे.

दिल्लीत झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी करात सुधारणा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जीएसटी कौन्सिलने 22 सप्टेंबरपासून सुधारित कर दर लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील 99 टक्के वस्तूंच्या किमती सोमवारपासून कमी होण्याची शक्यता आहे.

सोमवारपासूनच सुधारित किंमत

विक्रेत्यांना सोमवारपासूनच सुधारित किंमत लागू करण्याचे निर्देश दिले जाण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये दुग्धजन्य पदार्थांवर जीएसटी लागू करण्यात आला. त्यानंतर 2022 मध्ये जीएसटी 12 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला. आता कराचा दर कमी करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांवरील भार काही प्रमाणात कमी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT