भोपाल; वृत्तसंस्था : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क येथे ‘ज्वाला’ या नामिबियन मादी चित्त्याने 5 बछड्यांना जन्म दिल्याने भारतातील चित्त्यांची संख्या आता 53 वर पोहोचली आहे. ही माहिती केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदलमंत्री भूपेंदर यादव यांनी सोमवारी दिली.
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारतात ‘प्रोजेक्ट चित्ता’ सुरू झाल्यानंतर चित्त्यांच्या जन्माचा हा दहावा यशस्वी पिल्लांचा समूह ठरला आहे. या जन्मानंतर भारतात जन्मलेल्या चित्त्यांच्या पिल्लांची संख्या 33 झाली आहे. मंत्री यादव यांनी सांगितले की, ‘ज्वाला’ ही तिसर्यांदा आई बनली असून, तिच्यामुळे भारतातील चित्ता पुनर्स्थापना मोहिमेला मोठे बळ मिळाले आहे. त्यांनी या यशाचे श्रेय प्रकल्पात काम करणार्या पशुवैद्यक, वनाधिकारी आणि संवर्धन पथकांच्या मेहनतीला दिले. त्यांनी या घटनेला वन्यजीव संवर्धनासाठी ऐतिहासिक आणि आनंददायी क्षण, असे संबोधले आहे. ‘ज्वाला’ आणि तिची पिल्ले निरोगीपणे वाढतील आणि भारतातील चित्ता संवर्धन मोहिमेला अधिक बळ देतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या ‘गामिनी’ या चित्त्यानेही 4 बछड्यांना जन्म दिला होता. हा तिचा भारतातील दुसरा लिटर (पिल्लांचा समूह) होता. याशिवाय 28 फेब्रुवारी रोजी बोत्सवाना येथून आणलेल्या 9 चित्त्यांना (6 माद्या आणि 3 नर) कुनो राष्ट्रीय उद्यानातील क्वारंटाईन क्षेत्रात सोडण्यात आले आहे. सध्या त्यांची आरोग्य तपासणी आणि वातावरणाशी जुळवून घेण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यानंतर त्यांना हळूहळू उद्यानातील मोकळ्या परिसरात सोडण्यात येणार आहे.
* भारतातील चित्त्यांची सध्याची संख्या : 53
* भारतात जन्मलेली पिल्ले : 33
* ‘ज्वाला’चा हा तिसरा लिटर (पिल्लांचा समूह)
* चित्त्यांच्या जन्माचा 10 वा यशस्वी लिटर
* कुनो राष्ट्रीय उद्यान चित्ता पुनर्स्थापनेचे प्रमुख केंद्र
* योग्य अधिवासामुळे चित्त्यांसाठी अनुकूल
* नामिबिया, दक्षिण आफ्रिका आणि बोत्सवाना येथून चित्ते आणले
* वन्यजीव संवर्धनाच्या द़ृष्टीने भारतातील महत्त्वाचा प्रकल्प