राष्ट्रीय

NAFED | केंद्रीय गृह अमित शाह यांच्या हस्ते नाफेडच्या ई-लिलाव पोर्टलचे उद्घाटन

दलाली संपुष्टात येईल; शेतकऱ्यांचे पैसे ४८ तासांच्या आत थेट बँक खात्यात जमा होतील

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे नाफेडच्या ई-लिलाव पोर्टलचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, 'नाफेड'ने पोर्टल, दृष्टी, ईआरपी आणि 'नाफेड कल्याण' हे चार महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत.

२०१४ मध्ये बंद पडण्याच्या मार्गावर असलेली नाफेड मोदी सरकारच्या काळात ५०० कोटी रुपयांच्या नफ्यासह ७४ लाख शेतकऱ्यांना सेवा पुरवत आहे, असे ते म्हणाले. नाफेडच्या पोर्टलमुळे दलाली संपुष्टात येईल; शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे ४८ तासांच्या आत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतील, असे त्यांनी सांगितले. पुढील दोन वर्षांमध्ये एनसीसीएफ आणि नाफेड डाळींचा प्रत्येक दाणा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करतील, असे त्यांनी जाहीर केले.

यावेळी शेतकऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि करिअर विकासासाठी नाफेडची शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली. अमित शाह म्हणाले की, उत्पादन आणि खरेदी या दोन्ही आघाड्यांवर आज 'नाफेड'ने लक्षणीय वाढ नोंदवली आहे. डाळींच्या उत्पादनात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी, शेतकऱ्यांकडून डाळीचा प्रत्येक दाणा खरेदी केला जावा यासाठी 'एनसीसीएफ' आणि 'नाफेड' ला अधिक वेगाने पावले उचलावी लागतील. यामुळे शेतकऱ्यांना खात्रीशीरपणे योग्य आणि वाजवी भाव मिळणे सुनिश्चित होईल, परिणामी डाळींच्या लागवडीखालील क्षेत्रात आपसूकच वाढ होऊन देशाला डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भर होणे शक्य होईल.

आज 'नाफेड' चे कार्य केवळ कृषी उत्पादनांच्या खरेदीपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. गेल्या तीन वर्षांत नाफेडने सेंद्रिय शेती, बियाणे उत्पादन, किरकोळ व्यापार, जैव-खत निर्मिती, अन्नसुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांसारख्या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे नाफेडचे महत्त्व आणि नफाक्षमता या दोन्हींमध्ये वाढ झाली असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. सहकार मंत्रालयाची स्थापना झाली तेव्हा नाफेडची उलाढाल 20,000 कोटी रुपये होती, ती आता वाढून 30,000 कोटी रुपये झाली आहे. पुढील दोन वर्षांत ही उलाढाल 50,000 कोटी रुपयांच्या पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT