UIDAI Aadhaar app
नवी दिल्ली: केंद्र सरकारने जुने 'एम-आधार' (mAadhaar) ॲप लवकरच बंद करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्याऐवजी 'भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण' (UIDAI) कडून आधार सेवा अधिक सुरक्षित, जलद आणि अत्याधुनिक फीचर्स असलेले नवीन आधार ॲप सुरू करण्यात आले आहे. युजर्सचा वैयक्तिक डेटा अधिक सुरक्षित ठेवणे आणि डिजिटल पडताळणीची प्रक्रिया अधिक सोपी व आधुनिक करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
UIDAI च्या अधिकृत एक्स खात्यावरून याबाबत माहिती देण्यात आली. “mAadhaar लवकरच बंद होणार आहे. नवीन Aadhaar App डाउनलोड करा आणि अधिक वेगवान सेवा, स्मार्ट फीचर्स आणि सोपी आधार सुविधा अनुभवा,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
नवे Aadhaar App हे केवळ जुन्या अॅपचे अपडेटेड व्हर्जन नसून, आधार पडताळणी आणि माहिती शेअरिंगची पद्धतच बदलण्यात आली आहे. जुन्या अॅपमध्ये प्रमाणीकरणावेळी संपूर्ण आधार माहिती दिसत असे. मात्र, नव्या अॅपमध्ये फक्त आवश्यक माहितीच शेअर केली जाईल. त्यामुळे वैयक्तिक माहिती अधिक सुरक्षित राहणार आहे.
नवीन अॅपमधील सर्वात महत्त्वाचे फीचर म्हणजे सुरक्षित QR-आधारित आधार शेअरिंग. हॉटेल, रुग्णालये, सरकारी कार्यालये किंवा इतर सेवा केंद्रांवर आता संपूर्ण आधार क्रमांक दाखवण्याची गरज भासणार नाही. QR कोड स्कॅन करून आवश्यक माहितीच शेअर करता येणार आहे.
याशिवाय, प्रमाणीकरण प्रक्रियेतही मोठा बदल करण्यात आला आहे. याआधी केवळ मोबाईलवर येणाऱ्या OTP वर अवलंबून असलेली प्रणाली आता अधिक सुरक्षित करण्यात आली आहे. OTP सोबत Face Authentication आणि QR Verification यांसारख्या अतिरिक्त सुरक्षा टप्प्यांचा वापर केला जाणार आहे.
नव्या अॅपमुळे वापरकर्त्यांना स्वतःच्या बायोमेट्रिक माहितीवर अधिक नियंत्रण मिळणार आहे. फिंगरप्रिंट, फेस आणि आयरिस डेटा लॉक किंवा व्यवस्थापित करण्याची सुविधा थेट अॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. सार्वजनिक किंवा इतरांच्या डिव्हाइसवरून अनधिकृत प्रवेश होऊ नये, यासाठी हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.
नवीन Aadhaar App वापरण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत Play Store किंवा App Store वरून अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर आपली भाषा निवडून आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. OTP पडताळणीनंतर काही वापरकर्त्यांना Face Authentication पूर्ण करावे लागू शकते. यानंतर PIN किंवा बायोमेट्रिक लॉक सक्षम करावे लागेल. शेवटी आधार क्रमांक टाकून आणखी एक OTP Verification पूर्ण केल्यानंतर अॅप सक्रिय होईल.
दरम्यान, UIDAI ने myAadhaar पोर्टलवरील मोफत आधार दस्तऐवज अपडेट सेवा देखील वाढवली आहे. आता नागरिकांना 14 जून 2027 पर्यंत ओळख आणि पत्त्याशी संबंधित कागदपत्रे विनामूल्य अपडेट करता येणार आहेत. याआधी ही सुविधा 15 जून 2026 पर्यंतच उपलब्ध होती.