पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुण्यातील एका विशेष न्यायालयात सुनावणीदरम्यान आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील वक्तव्यामुळे दोन नेत्यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांनी अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली आहे. हे प्रकरण वीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या कथित मानहानीकारक टिप्पणीशी संबंधित असून, तक्रारदार सत्याकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्यावर खटला दाखल केला आहे.
राहुल गांधी यांच्या वतीने वकील मिलिंद दत्तात्रय पवार यांनी न्यायालयात लेखी अर्ज सादर करून म्हटले आहे की, तक्रारदार हे नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे यांचे वंशज असून, त्यांचा इतिहास हिंसक कारवायांशी जोडलेला आहे. पवार यांनी आरोप केला की, सध्याचे राजकीय वातावरण आणि काही नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राहुल गांधी यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. न्यायालयाने हा अर्ज नोंदवून घेतला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे की, तक्रारदार हे नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे यांचे वंशज असून, त्यांचा इतिहास हिंसक कारवायांचा राहिला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी रवनीत सिंग बिट्टू आणि तरविंदर सिंग मारवाह यांचाही उल्लेख केला.
राहुल गांधी यांच्या अर्जात रवनीत सिंग बिट्टू यांच्या नावाचा समावेश आहे. रवनीत यांनी राहुल गांधी यांना देशातील 'क्रमांक एकचे दहशतवादी' म्हटले होते. याशिवाय, याचिकेत भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह यांच्या नावाचाही उल्लेख आहे. मारवाह यांनीही राहुल गांधी यांना धमकी दिली होती. "राहुल गांधी यांचा शेवट त्यांच्या आजीप्रमाणे होईल," असे तरविंदर सिंह म्हणाले होते. सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांना अतिरिक्त सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी विनंती राहुल यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सत्याकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात पुणे न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यामध्ये म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी लंडन येथील एका भाषणात दावा केला होता की, "सावरकरांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली आणि याचा त्यांना आनंद झाला." सत्याकी यांनी हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले आहे, कारण अशी कोणतीही घटना किंवा पुस्तकाचा उल्लेख सावरकरांच्या साहित्यात आढळत नाही.
दरम्यान, ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान राहुल गांधी यांनी सावरकरांवर टिप्पणी केली होती, ज्यात त्यांनी म्हटले होते की, ‘‘सावरकरांनी इंग्रजांकडून निवृत्तीवेतन (पेन्शन) घेतले आणि भीतीपोटी दयेचे अर्ज लिहिले.’’ या वक्तव्यांच्या आधारे नाशिकमध्ये देवेंद्र भुतडा आणि लखनऊमध्ये वकील नृपेंद्र पांडे यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचे खटले दाखल केले आहेत. नाशिक न्यायालयाने राहुल गांधी यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता, तर लखनऊ येथील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना तंबी दिली होती. ‘‘सावरकरांवर यापुढे अशी अपमानजनक टिप्पणी करू नये,’’ असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.