अलिगड (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील अलिगडमधून एक प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनले आहे. येथे एका मुस्लिम तरुणीने हिंदू धर्म स्वीकारून आपल्या प्रियकराशी विवाह केला आहे. मात्र, या प्रेमविवाहानंतर आता या जोडप्याला केवळ कुटुंबीयांकडूनच धमक्या मिळत नसून, त्यांनी पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत.
पीडित जोडप्याने आता वरिष्ठ पोलिस अधीक्षकांकडे न्यायाची याचना केली आहे. हे प्रकरण हरदुआगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भटौला गावातील आहे. येथील एका मुस्लिम तरुणीने आपल्या हिंदू प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी धर्मपरिवर्तन केले. पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार, तिने सनातन धर्माने प्रभावित होऊन स्वतःच्या इच्छेने धर्म बदलला आणि आपले नाव बदलून ‘सोनिया’ ठेवले. मात्र या लग्नानंतर सोनियाच्या कुटुंबीयांनी तिला आणि तिच्या पतीला लक्ष्य केले आहे.
कुटुंबीय त्यांच्यावर सतत दबाव टाकत असून जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप या जोडप्याने केला आहे. या प्रकरणात पीडित तरुणीने पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तिचा आरोप आहे की, पोलिसांनी त्यांच्या घरात घुसून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता तिच्या पतीच्या मावशीच्या भावाला पोलिसांनी जबरदस्तीने उचलून पोलिस ठाण्यात नेले.