Pakistan | मुनीर यांच्याकडून मृत दहशतवाद्यांचा सन्मान Pudhari File Photo
राष्ट्रीय

Pakistan | मुनीर यांच्याकडून मृत दहशतवाद्यांचा सन्मान; पाकिस्तान लष्कराची दहशतवाद्यांशी जवळीक पुन्हा उघड

जैशचा कमांडर इलियासकडून ‘ऑपरेशन सिंदूर’वरून पाकची पोलखोल

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; पीटीआय : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याचे आणि त्यांना सन्मान देण्याचे आदेश थेट पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी दिले होते, असा खळबळजनक दावा जैश-ए-मोहम्मदच्या एका कमांडरने केला आहे. या दाव्यामुळे पाकिस्तान लष्कराची दहशतवाद्यांशी असलेली जवळीक पुन्हा एकदा उघड झाली आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये, जैशचा कमांडर इलियास काश्मिरी असे म्हणताना दिसत आहे की, लष्करप्रमुखांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यास आणि त्यादरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यास सांगितले होते. काही दिवसांपूर्वीच इलियास काश्मिरीने भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान बहावलपूरमध्ये झालेल्या नुकसानीची कबुली दिली होती. त्यानंतर आता हा दुसरा व्हिडीओ समोर आला आहे.

दहशतवाद्यांचे समर्थन

या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांचा दिलेल्या मुलाखतीचा एक भागही दाखवण्यात आला आहे, ज्यात ते मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना श्रद्धांजली देण्याच्या कृतीचे समर्थन करत आहेत. पाकिस्तानचे सैन्य त्यांना श्रद्धांजली का देणार नाही? असा प्रतिप्रश्न ते करताना दिसत आहेत. इतकेच नाही, तर 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा भारताने अद्याप दिलेला नाही, असा दावाही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT