Mumbai Goa National Highway pudhari photo
राष्ट्रीय

Mumbai Goa Highway | मुंबई-गोवा महामार्ग दोन महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता!

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली: कोकणवासीयांसह मुंबई आणि गोव्यादरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. महामार्गाचे उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, येत्या दोन महिन्यांत संपूर्ण महामार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. भूसंपादन, कंत्राटदारांकडून कामातील विलंब, आर्थिक अडचणी आणि विविध तांत्रिक कारणांमुळे या प्रकल्पाला सातत्याने मुदतवाढ मिळाली. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आणि अपूर्ण रस्त्यांचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, महामार्गाचे सुमारे ९९ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी दिली होती. उर्वरित काम एप्रिल २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचे मंत्रालयाचे सचिव व्ही. उमाशंकर यांनी सांगितले होते. मात्र, उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार उर्वरित काम निर्धारित मुदतीच्या आधीच पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत महामार्ग पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT