MSME Amendment Bill 2026 | गदारोळातच ‘एमएसएमई दुरुस्ती विधेयक-२०२६’ लोकसभेत मंजूर 
राष्ट्रीय

MSME Amendment Bill 2026 | गदारोळातच ‘एमएसएमई दुरुस्ती विधेयक-२०२६’ लोकसभेत मंजूर

लघू उद्योगांना थकीत रक्कम मिळणे आता होणार सुलभ

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : लोकसभेत शुक्रवारी विरोधकांच्या गदारोळात ‘सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग विकास (दुरुस्ती) विधेयक, २०२६’ आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. राज्यसभेत हे विधेयक आधीच संमत झाले असून, आता ते अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाईल.

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री जीतनराम मांझी यांनी लोकसभेत हे विधेयक मांडताना सांगितले की, या सुधारणा विधेयकामुळे लघू उद्योगांना वेळेवर थकीत रक्कम मिळणे सुनिश्चित होईल आणि त्यांच्या रोख रकमेच्या समस्येवर तोडगा निघेल. त्यांच्या या निवेदनानंतर विरोधी सदस्यांनी फलक दाखवून विधेयकाला विरोध दर्शवला.

यादरम्यान, पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया यांनी विरोधी सदस्यांना आपापल्या जागेवर जाण्याचे आणि कामकाज सुरळीत चालू देण्याचे आवाहन केले. त्यानंतरही विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवला. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांच्या वर्तनावर चिंता व्यक्त केली आणि आवाजी मतदानाने ‘एमएसएमई विधेयक’ मंजूर करण्यात आले. विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्याने लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

राज्यसभेत खर्गे-रिजिजू यांच्यात खडाजंगी

राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात येऊन निवेदन द्यावे, या आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी गृहमंत्र्यांना सभागृहात येण्यास सांगितले होते. तथापि, गृहमंत्री सभापतींच्या शब्दाचाही आदर करत नाहीत, असा आरोप खर्गे यांनी केला. यावर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी तीव्र आक्षेप घेतला. सभापतींनी गृहमंत्र्यांना असा कोणताही निर्देश दिला नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणता मंत्री कधी सभागृहात येईल हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही, असे सांगत त्यांनी आव्हान दिले की, जेव्हा गृहमंत्री सभागृहात येऊन बोलतील, तेव्हा विरोधकांची बोलतीच बंद होईल. दरम्यान, राज्यसभेचे कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT