राष्ट्रीय

Sudha Murty : 'तुमचे अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहेत', खासदार सुधा मूर्ती यांना फोन, अज्ञात कॉलरविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

आजकाल सायबर गुन्हेगार केवळ सामान्य नागरिकांनाच नव्हे, तर प्रतिष्ठित व्यक्तींनाही आपल्या फसवणुकीचे लक्ष्य बनवत आहेत. असाच एक फसवणुकीचा अयशस्वी प्रयत्न इन्फोसिस फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा, राज्यसभा खासदार आणि प्रसिद्ध समाजसेविका सुधा मूर्ती यांच्या बाबतीत घडला. एका अज्ञात व्यक्तीने त्यांना फेक कॉल करून मोबाइल सेवा बंद करण्याची धमकी दिली. तसेच मूर्ती यांच्याकडून गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मूर्ती यांनी २० सप्टेंबर रोजी बंगळूरु येथील सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली.

तक्रारीतील आरोप

सुधा मूर्ती यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘५ सप्टेंबर रोजी सकाळी ९:४० वाजता त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. 'ट्रूकॉलर'वर हा क्रमांक दूरसंचार विभागाचा असल्याचे दिसले. फोनवरून बोलणा-या व्यक्तीने स्वतःची ओळख दूरसंचार मंत्रालयाचा कर्मचारी अशी करून दिली. त्याच्या म्हणण्यानुसार माझा मोबाइल क्रमांक जानेवारी २०२० मध्ये आधार कार्डशी संलग्न न करताच नोंदणीकृत करण्यात आला आहे. त्या व्यक्तीने असेही सांगितले माझ्या क्रमांकावरून अश्लील व्हिडिओ पाठवले जात असून दुपारी १२ वाजेपर्यंत मोबाइल सेवा खंडित केली जाईल,’ अशी धमकीही दिली.

सुधा मूर्तींकडून कारवाईची मागणी

फोन करणा-या व्यक्तीने मूर्ती यांच्याकडून गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच बोलताना असभ्य भाषेचा वापर केला, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या धमकी आणि गोपनीय माहिती मिळवण्याच्या प्रयत्नाबद्दल मूर्ती यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अशा प्रकारचे फसवे फोन येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, सरकार तसेच सेवा पुरवणा-या टेलीकॉम कंपन्यादेखील याबद्दल जनजागृती करत आहेत.

सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ

देशभरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १९ महिन्यांत मुंबईमध्ये लोकांची फसवणूक करण्यासाठी वापरले गेलेले ११,००० हून अधिक मोबाइल क्रमांक बंद (ब्लॉक) करण्यात आले आहेत. मे २०२२ पासून सुरू झालेल्या '१९३०' या हेल्पलाइनमुळे मुंबई पोलिसांनी सायबर गुन्ह्यांना बळी पडलेल्या नागरिकांचे तब्बल ३०० कोटींहून अधिक रुपये वाचवले आहेत.

मे २०२२ पासून शहराच्या सायबर शाखेकडे १३.१९ लाखांहून अधिक कॉल आले आहेत. या तक्रारींवर आधारित, शेअर ट्रेडिंग-गुंतवणूक फसवणूक, डिजिटल अरेस्ट, ऑनलाइन टास्क फसवणूक, ऑनलाइन खरेदीतील फसवणूक, कर्ज आणि नोकरीच्या बहाण्याने होणारी फसवणूक अशा १.३१ लाख प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.

यातील बहुतेक प्रकरणांमध्ये, फसवणूक करणाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या किंवा मूळ वापरकर्त्याकडून खरेदी केलेल्या सिम-कार्डचा वापर केल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी अशा ११,०६३ मोबाइल क्रमांकांवर कारवाई करून ते बंद केले आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT