Madhya Pradesh Forest Officer Sanjeev Kumar Sharma Lokayukta Raid File Photo
राष्ट्रीय

MP Forest Officer: उत्पन्नापेक्षा ५६० टक्के अधिक संपत्ती! वन अधिकाऱ्याचे ७.६ कोटी रुपयांचे 'साम्राज्य' लोकायुक्तांकडून उघड

सातपुडा व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक संचालक संजीव कुमार शर्मा यांच्या निवासस्थानी लोकायुक्तांच्या विशेष पोलीस पथकाने छापे टाकले. यात सुमारे ७.६ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आली आहे.

मोहन कारंडे

Madhya Pradesh Forest Officer Sanjeev Kumar Sharma Lokayukta Raid

भोपाळ: पचमढी येथील सातपुडा व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक संचालक संजीव कुमार शर्मा यांच्या सरकारी निवासस्थानी आणि कार्यालयात, तसेच छिंदवाडा येथील त्यांच्या खासगी निवासस्थानी लोकायुक्तांच्या विशेष पोलीस पथकाने शनिवारी छापे टाकले. या कारवाईत सुमारे ७.६ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आली आहे.

लोकायुक्त पोलिसांच्या भोपाळ विभागाच्या विविध पथकांनी न्यायालयाचे सर्च वॉरंट मिळवून एकाच वेळी तिन्ही ठिकाणी छापेमारी केली. शर्मा यांनी आपल्या पत्नीच्या आणि इतर खासगी व्यक्तींच्या नावावर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याची गोपनीय माहिती लोकायुक्तांना मिळाली होती. प्राथमिक पडताळणीत ही मालमत्ता उत्पन्नाच्या २२८ टक्के अधिक असल्याचा अंदाज होता; मात्र प्रत्यक्ष झडतीनंतर हा आकडा ५६० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यांच्याविरुद्ध 'भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८' (२०१८ मध्ये सुधारित) च्या कलम १३(१)(बी) आणि कलम १३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाप्यात काय-काय सापडले?

झडतीदरम्यान २६.३६ लाख रुपयांची रोकड, सुमारे ३.५ कोटी रुपये किमतीचे २.५२८ किलो सोन्याचे दागिने आणि २.९४ लाख रुपये किमतीची १.६५६ किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. शर्मा यांच्या मालकीचे दोन मोठे व्यावसायिक प्रकल्प समोर आले आहेत. यामध्ये सुमारे २ कोटी रुपये किमतीचे 'इकोटेल रिसॉर्ट' आणि १ कोटी रुपये किमतीचा 'सेरेनिटी द व्हिला' यांचा समावेश आहे. मालमत्तेचे एकूण अंदाजे मूल्य आणखी वाढू शकते.

मालमत्तेचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता

महिंद्रा स्कॉर्पिओ, महिंद्रा केयूव्ही, बुलेट मोटारसायकल आणि एक स्कूटर अशी सुमारे ३१.२ लाख रुपयांची वाहने, तसेच ५० लाख रुपये किमतीचे घरातील महागडे साहित्य आढळून आले आहे. जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित तब्बल २८ दस्तऐवज तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत. रिसॉर्टचे अंतिम मूल्यांकन आणि जमिनीच्या व्यवहारांची सखोल चौकशी पूर्ण झाल्यानंतर या बेहिशेबी मालमत्तेचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

कठोर कारवाई करण्याचे निर्देश

लोकायुक्त महासंचालक योगेश देशमुख यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. ही मोहीम उपमहानिरीक्षक मनोज कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. या मोहिमेचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक वीरेंद्र सिंग आणि पोलीस उपअधीक्षक अजय मिश्रा यांनी केले. त्यांना पोलीस उपअधीक्षक भैयालाल प्रजापती, निरीक्षक रजनी तिवारी, घनश्याम मास्कोले आणि नीतू कुसारिया यांच्यासह भोपाळ विभागातील इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT