राष्ट्रीय

Amol Kolhe-PM Modi : पंतप्रधानांसोबतच्या भेटीचा संबंध NDA प्रवेशाशी जोडणे योग्य नाही : खासदार अमोल कोल्हे यांची स्‍पष्‍टोक्‍ती

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्‍ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ खासदारांनी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. खासदारांच्या भेटीनंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असे कोल्हे यांनी स्पष्ट केले.

लोकसभेच्या आठही मतदारसंघांतील प्रश्न खासदारांनी पंतप्रधानांसमोर मांडले. खासदार नीलेश लंके यांनी आरोग्य क्षेत्राशी संबंधित अनेक मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडल्याचे त्यांनी सांगितले. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प, इंद्रायणी मेडिसिटी, चाकण एमआयडीसीसह मतदारसंघांतील विविध प्रश्नांवर चर्चा झाल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले. यापूर्वी संबंधित मंत्र्यांची भेट घेऊनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने योग्य ठिकाणी हे मुद्दे मांडण्यात आल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधानांसोबतच्या या भेटीचा संबंध लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एनडीएतील प्रवेशाशी जोडणे योग्य नाही, असेही कोल्हे यांनी स्पष्ट केले. यावेळी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मुद्द्यावरूनही चर्चा झाल्याचे समजते.

चाकण एमआयडीसीतील खड्ड्यांवरून सवाल

चाकण एमआयडीसीतील पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर कोल्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. चाकण एमआयडीसीची अवस्था आता अत्यंत वाईट आहे. खड्ड्यांचे साम्राज्य आणि वाहतूक कोंडी हा अत्यंत मोठा विषय आहे. ५९ कोटी रुपयांचे रस्त्याचे टेंडर निघूनही खड्डे मुजवले जात नाहीत, असा आरोप त्यांनी केला. या प्रश्नाबाबत राज्य सरकारला वारंवार पत्र दिल्याचे सांगत या खड्ड्यांमुळे १९ लोकांचे बळी गेले आहेत. याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी केला. चाकणमधील कंपन्यांचे स्थलांतर हा गंभीर विषय असल्याचे कोल्हे यांनी नमूद केले.

साप समजून भुई थोपटण्यात अर्थ नाही

मतदारसंघ पुनर्रचनेच्या संभाव्य विधेयकाबाबत विचारले असता, आधी विधेयक येऊ द्या, मग त्यावर बोलू. मसुदाच अजून समोर आलेला नाही, मग त्यावर चर्चा कशाला? साप समजून भुई थोपटण्यात काही अर्थ नाही, अशी भूमिका कोल्हे यांनी मांडली. मात्र, यापूर्वीच्या मसुद्याबाबत असलेले आक्षेप कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हाच ड्राफ्ट पुन्हा आला तर आमची भूमिका काय असेल, हे आधीच दिसून आले आहे, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT