Mouni Roy Harassment
नवी दिल्ली : 'नागिन', 'देवों के देव महादेव' आणि इतर मालिकांमधील भूमिकांमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री मौनी रॉय हिने नुकताच तिला आलेला एक भयावह अनुभव शेअर केला आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट लिहून तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितले. एका कार्यक्रमात दोन वयस्कर पुरुषांनी तिच्यासोबत गैरवर्तणुक केल्याचे मौनीने उघड केले असून यावर त्वरित कारवाई करावी अशी विनंती केली आहे.
मौनी रॉयने हरियाणातील कर्नाल येथील एका कार्यक्रमादरम्यान आलेल्या एका अत्यंत त्रासदायक अनुभवाबद्दल सांगितले आहे. ती जेव्हा स्टेजवर जात होती, तेव्हा एका कुटुंबातील पुरुषांनी फोटो काढण्याच्या बहाण्याने तिच्या कंबरेवर हात ठेवले.
छेडछाडीबद्दल तिने लिहिले की, "कर्नालमध्ये माझा एक कार्यक्रम होता आणि तेथील पाहुण्यांच्या, विशेषतः दोन काकांच्या (वृद्ध व्यक्ती) वागणुकीमुळे मला खूप किळस वाटली आहे. त्यांचे वय आजोबांइतके असूनही त्यांचे वागणे अत्यंत चुकीचे होते. कार्यक्रम सुरू झाला आणि मी मंचाकडे जात असताना, त्या काकांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी फोटो काढण्यासाठी माझ्या कंबरेवर हात ठेवला. मला ते आवडले नाही आणि जेव्हा मी म्हणाले, 'सर, कृपया तुमचा हात काढा,' तेव्हा त्यांनी माझे ऐकले नाही."
मौनीने सांगितले की, "स्टेजवरची परिस्थिती तर त्याहून वाईट होती. दोन व्यक्ती अगदी समोर उभे राहून अश्लील शेरेबाजी, हावभाव करत होते आणि नावाने हाका मारत होते." तिने सुरुवातीला हे प्रकरण सभ्यपणे हाताळण्याचा प्रयत्न केला. "मी हे लक्षात येताच त्यांना शांतपणे खुणेने 'असे करू नका' असे सांगितले, पण त्यावर त्यांनी माझ्यावर गुलाब फेकून मारण्यास सुरुवात केली."
परफॉर्मन्स सुरू असतानाच एका क्षणी मौनीने तो अर्धवट सोडून जाण्याचाही प्रयत्न केला. तिने लिहिले की, "परफॉर्मन्स दरम्यानच मी स्टेजच्या एक्झिटकडे जाऊ लागले, पण नंतर परत येऊन माझा परफॉर्मन्स पूर्ण केला." असे करूनही त्यांचे वर्तन थांबले नाही. "आयोजकांनी त्यांना तिथून हटवले नाही," अशी खंत तिने व्यक्त केली. जर माझ्यासारख्या व्यक्तीला या सगळ्यातून जावे लागत असेल, तर काम सुरू करणाऱ्या नवीन मुलींना काय सहन करावे लागत असेल, याची मी फक्त कल्पनाच करू शकते. मी अपमानित आणि त्रस्त झाले आहे आणि या असह्य वर्तनासाठी अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी माझी इच्छा आहे."
दुसऱ्या एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये मौनीने म्हटले की, "आम्ही कलाकार आहोत आणि आमच्या कलेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत आहोत. मला आश्चर्य वाटते की जर या पुरुषांच्या मित्रांनी त्यांच्या मुलींशी, बहिणींशी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी असेच वर्तन केले तर ते काय करतील? तुमची लाज वाटते!"