पुढारी ऑनलाईन डेस्क : मुलीला सुंदर पती आणि घरंदाज सासर मिळावे, ही प्रत्येक आईचे स्वप्न असते. आपला जावई लाखात एक असावा, असेही मुलीच्या आईला वाटत असते. परंतु, उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये आपल्या होणाऱ्या जावयासोबतच सासू घरातील पैसे आणि दागिने घेऊन पळून गेल्याने मोठा धक्का बसला आहे. जावई आजारी आहे आणि त्याला भेटायला जायचे आहे. असे सांगून सासू घराबाहेर पडली. याबाबत महिलेचा पती जितेंद्र यांनी पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. (Aligarh News)
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कपडे विकायचा. मुलीच्या नातेवाईकांनी राहुलच्या घरी जाऊन आतापर्यंत खर्च केलेले पैसे परत मागितले आहेत. मुलीच्या कुटुंबाला राहुलच्या कुटुंबासोबत कोणताही संबंध ठेवायचा नाही. दुसरीकडे, अनिता देवीचे पती जितेंद्र यांना मोठा धक्का बसला असून अनिता जेव्हा परत येईल तेव्हा ते याबाबत तिला जाब विचारणार आहेत. दरम्यान, जावई राहुलसोबत पळून गेलेली सासू अनिता देवीबद्दल वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. सासू पेक्षा जावई ११ वर्षांनी लहान आहे. सासू आणि जावयाच्या कुटुंबाने आता त्या दोघांचा शोध सुरू केला आहे.
१६ एप्रिल रोजी लग्न होणार होते. निमंत्रण पत्रिका छापल्या गेल्या होत्या. आणि नातेवाईकांना आमंत्रणे पाठवली जात होती. दरम्यान, ज्या घरात सनई चौघडे वाजणार होते. त्या घरात आता भयाण शांतता पसरली आहे. सुखी संसाराचे स्वप्न पाहणारी मुलगी आता तिच्या आईचे तोंडही पाहू इच्छित नाही. या घटनेनंतर मुलगी आजारी पडली असून तिला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
जितेंद्र सांगतात की त्यांची पत्नी केवळ घरातून पळून गेली नाही. तर सुमारे अडीच लाख रुपये रोख आणि मौल्यवान दागिनेही घेऊन गेली आहे. हे पैसे आणि दागिने मुलीच्या लग्नासाठी जमा केले होते. मुलगी शिवानीने पोलिसांना भावनिक आवाहन केले आहे की. माझ्या आईने आमच्या कुटुंबाचा लौकीक मातीत मिळवला आहे. आम्हाला आता त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत. पण आईने घरातून नेलेले पैसे आणि किंमती दागिने आम्हाला परत हवे आहेत.
डेप्युटी एसपी महेश कुमार म्हणाले की, मद्रक पोलिस ठाण्यात जावयासोबत पळून गेलेल्या महिलेच्या पतीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. ज्याच्या आधारे तपास सुरू केला आहे. ज्या तरुणासोबत ही महिला पळून गेली आहे. तो तिचा होणारा जावई आहे. पूर्वी तो उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये काम करत होता. प्राथमिक तपासात पोलिसांना अशी माहिती मिळाली आहे की, दोघेही बसने उत्तराखंडला निघाले असावेत. या दिशेने पुढे जात पोलिसांनी आता दोन्ही मोबाईल नंबरचे कॉल डिटेल्स काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच दोन्ही मोबाईल फोनचे आयएमईआय नंबर मिळविले जातील, जेणेकरून त्यांचे अचूक स्थान शोधता येईल आणि ते लवकरात लवकर सापडतील.