नवी दिल्ली/श्रीनगर; वृत्तसंस्था : कुलगाममधील ‘सीआरपीएफ’ चौकीवर बुधवारी (दि. ११) झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील ‘लष्कर-ए-तोयबा’चा मोस्ट वाँटेड कमांडर लतिफ भट आणि त्याचा साथीदार उमर यांचा जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी राबवलेल्या मोहिमेत सोमवारी (दि. १६) खात्मा करण्यात आला. या दोघांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात तीव्र शोधमोहीम सुरू केली होती. लतिफ भटवर १५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, त्यामुळे त्याचा खात्मा हे दहशतवादविरोधी मोहिमेतील मोठे यश मानले जात आहे.
जुलै महिन्यात शोपियाँमध्ये पाच दिवस चाललेल्या चकमकीत त्याचा म्होरक्या झाकीर गनई मारला गेला होता; मात्र लतिफ तिथून निसटण्यात यशस्वी झाला होता. स्थलांतरित मजुरांवरील हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याच्यावर १५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करून खोऱ्यात त्याचे पोस्टर्स लावले होते. अखेर सोमवारी सुरक्षा दलांनी अचूक सापळा रचून या कुख्यात दहशतवाद्याचा खेळ खल्लास केला.
२०२५ मध्ये बेपत्ता अन् दहशतवादी
२२ वर्षीय लतिफ भट हा कुलगाम जिल्ह्यातील ख्रेवान चादर गावचा रहिवासी होता. त्याने पदवी शिक्षणासाठी शासकीय पदवी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. मात्र, शिक्षण अर्धवट सोडून तो सुतार काम करू लागला. २०२५ मध्ये तो अचानक बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी कुलगाम पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती. नंतर तपासात असे समोर आले की, पाकिस्तानस्थित हँडलर्स आणि घोषित दहशतवादी सज्जाद गुल याने त्याला दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त केले होते. तो ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि त्याची शाखा असलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’मध्ये सामील झाला.
खोऱ्यात दहशतीचे जाळे, मोठे हल्ले
‘लष्कर-ए-तोयबा’चा कमांडर झाकीर अहमद गनई याच्यासोबत मिळून लतिफ भट कुलगाम, अनंतनाग आणि शोपियाँ जिल्ह्यांत सक्रिय झाला होता. स्थानिक नसलेले नागरिक आणि सुरक्षा दलांच्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी त्याने स्लीपर सेल पुन्हा सक्रिय केले होते. हल्ला करून पळून जाण्याच्या (शूट अँड स्कूट) तंत्राचा तो वापर करत असे. यावर्षी काश्मीर खोऱ्यात झालेल्या अनेक मोठ्या दहशतवादी घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. यामध्ये २२ जुलै रोजी अनंतनागच्या लाल चौक परिसरात एका पोलिस कॉन्स्टेबलची हत्या आणि ३१ जुलै रोजी कुलगाममध्ये छत्तीसगडमधील स्थलांतरित मजुरांच्या हत्येचा समावेश आहे.